Advertisement

Mumbai Rains: रस्ता कुण्याच्याही ताब्यातील असो, दुरूस्त झालाच पाहिजे- उद्धव ठाकरे

रस्ता कुणाच्याही ताब्यातील असो, त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं आणि रस्ता दुरुस्तीचं काम केलं पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

Mumbai Rains: रस्ता कुण्याच्याही ताब्यातील असो, दुरूस्त झालाच पाहिजे- उद्धव ठाकरे
SHARES

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबण्यासोबत मुंबईकरांना आणखी एक समस्या सतावते, ती म्हणजे रस्त्यांवरील खड्डे. यंदाच्या पावसाळ्यात रस्ता कुणाच्याही ताब्यातील असो, त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं आणि रस्ता दुरुस्तीचं काम केलं पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. 

मुंबईमधील पावसाळ्यातील तयारी आणि कोरोना प्रतिबंध यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, वॉर्ड अधिकारी आदी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महापालिकेने एमएमआरडीए, रेल्वे, बीपीटी, मेट्रो, एअरपोर्ट ॲथोरिटी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या सर्व संबंधित यंत्रणांची समन्वय बैठक आयोजित करून सर्व कामांना गती द्यावी. रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी सर्व संबंधित यंत्रणांचे एकत्रित पथक स्थापन करण्यात यावं. रस्ता कुणाच्याही ताब्यातील असो, त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं आणि रस्ता दुरुस्तीचं काम केलं पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुंबईत पावसामुळे तुंबणारं पाणी, रस्त्यांवर पडणारे खड्डे आदी बाबत मुंबई महापालिकेसह मुंबईत अन्य ज्या विविध यंत्रणा आहेत त्यामध्ये समन्वय ठेवण्यात यावा, अशी सूचना परिवहनमंत्री ॲड. परब यांनी देखील दिली. 

हेही वाचा- पावसाची सोमवार विश्रांती; ११६.१ मिलीमीटरची नोंद

कोरोनासंदर्भात राज्यात सुरू असलेल्या कामाबद्दल केंद्रीय पथकाने कौतुक केलं आहे. मुंबईत यंत्रणा अहोरात्र मेहनत करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांना स्टेरॉईड दिलं जातं. त्याबाबत सर्व कोरोना रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात आणि त्यानुसारच उपचारात त्याचा वापर करण्यात यावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पावसाचे पुढील काही महिने सर्वांसाठी आव्हानाचे आहे. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या कोरोना उपचार केंद्रांवर वाढणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावं. ट्रॅकींग आणि टेस्टींग वाढविण्यात यावं आणि संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा देखील वाढवावी. मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.

मुंबईत ज्या ठिकाणी अर्धवट बांधकामे होऊन इमारती ओस पडलेल्या आहेत अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती केंद्रे होऊ नये याकरिता फवारणीचे काम हाती घ्यावं. भूमिगत कामांच्या ठिकाणी देखील पाणीसाठा होऊन डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ शकतात ते वेळीच नष्ट करा. गणेशोत्सव काळात आरोग्य तपासणी, रक्तदान, प्लाझ्मादानासारखे उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यासाठी नियोजन करण्याची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केली.

हेही वाचा- Hotel & Restaurant: राज्यात लवकरच सुरू होणार हाॅटेल व्यवसाय- उद्धव ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा