
मुंबईत शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी बुधवारी वृक्ष प्राधिकरण विभागाची तातडीची बैठक घेत अधिकाऱ्यांना शहरभरातील धोकादायक झाडांची ओळख पटवून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
महापौरांनी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था तसेच प्रमुख चौक आणि रस्त्यांलगत असलेल्या झाडांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले.
वाळलेली, एका बाजूला झुकलेली, कमकुवत झालेली किंवा कोसळण्याचा धोका असलेली झाडे तातडीने ओळखून त्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, यापूर्वी छाटणी किंवा तपासणी करण्यात आलेल्या झाडांचेही पुन्हा मूल्यमापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. छाटणीनंतर रस्त्यावर पडून राहिलेल्या फांद्या तातडीने हटवण्याचे आदेशही महापौरांनी दिले.
अलीकडील घटनांनंतर नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी शहरातील सर्व झाडांचे 'ट्री हेल्थ ऑडिट' करण्याची मागणी केली आहे. धोकादायक झाडांची माहिती नागरिकांनी महापालिकेला द्यावी, जेणेकरून वेळेत कारवाई करता येईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात ठाण्यात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत सुमारे 160 झाडे उन्मळून पडली आहेत.
विशेष म्हणजे, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात केवळ 68 झाडे धोकादायक असल्याचे नमूद केले होते. प्रत्यक्षात कोसळलेल्या झाडांची संख्या त्याच्या जवळपास तिप्पट असल्याचे समोर आले आहे.
महिनानिहाय आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये 8 झाडे कोसळली होती. त्यानंतर ही संख्या सातत्याने वाढत जाऊन मे महिन्यात 33 आणि जूनमध्ये तब्बल 78 झाडे उन्मळून पडली.
गेल्या काही वर्षांतील आकडेवारीही चिंताजनक आहे. 2023 मध्ये 362 झाडे आणि 344 मोठ्या फांद्या, तर 2024 मध्ये 676 झाडे आणि 485 मोठ्या फांद्या कोसळल्याची नोंद आहे.
मंगळवारी मुंबईतील चेंबूर येथे 60 ते 70 वर्षे जुने पिंपळाचे झाड शाळेच्या बसवर कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले होते. बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी होते. या झाडाबाबत यापूर्वी कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झाली नव्हती, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली होती.
दरम्यान, बुधवारी रात्री नवी मुंबईतील वाशी पोस्ट ऑफिस लेन परिसरातही एक मोठे झाड कोसळले. या घटनेत एका कुटुंबातील सदस्य थोडक्यात बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तातडीने झाड हटवण्याचे आदेश दिले.
