Advertisement

शाळेच्या पुनर्बांधणीसह मैदानाचाही होणार विकास, मात्र पालिकेचं होणार नुकसान


शाळेच्या पुनर्बांधणीसह मैदानाचाही होणार विकास, मात्र पालिकेचं होणार नुकसान
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मैदानांचा विकास करून त्याठिकाणी फुटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी तसंच बास्केटबॉल खेळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा मुलुंडमधील एस. एल. रोड महापालिका शाळेच्या मैदानात करण्यात आहे. परंतु प्रत्यक्षात या शालेय इमारतीची दुरुस्ती तथा पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच प्रशासनानं या शाळेच्या मैदानावर क्रीडांगण विकसित करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे शालेय इमारतीच्या पुनर्बांधकामात या मैदानाची दूरवस्था होणार असल्यामुळे त्यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाण्याची शक्यता आहे.


सात शाळांच्या मैदानांचा होणार विकास

मुंबईतील महापालिका शाळांच्या मोकळ्या मैदानांचा विकास करण्यासंबंधी उपायुक्त (शिक्षण) यांच्या पुनर्विलोकन सभेमध्ये एकूण ७ महापालिका शाळांच्या खेळाच्या मैदानांचा विकास करण्याचे धोरण निश्चित झाले आहे. यापूर्वी चार शाळांच्या मैदानांचा विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर आणखी तीन शाळांच्या मैदानांचा विकास करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आणला आहे.


या सुविधा असतील

पूर्व उपनगरातील टी विभागातील एस. एल. रोड महापालिका शाळा, एन विभागातील रमाबाई सहकार नगर नंबर ३ शाळा आणि एम-पूर्व येथील देवनार कॉलनी महापालिका शाळांच्या मैदानांमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, बॉस्केटबॉलची सुविधा उपलब्ध करून विकास केला जाणार आहे. यासाठी विक्रांत कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले आहे. या तिन्ही शाळांच्या मैदानासाठी १ कोटी १६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.


नाले बांधणाऱ्या कंत्राटदाराची नेमणूक

या शाळांच्या मैदानांचा विकास करण्यासाठी महापालिकेने चक्क नाल्यांची बांधणी करणाऱ्या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या शाळांच्या मैदानाचा विकास करणाऱ्या विक्रांत कन्स्ट्रक्शन या कंपनीने पूर्व उपनगरातील यापूर्वीच्या प्रभाग ११३ व ११४मधील विविध पर्जन्य जलवाहिन्यांच्या कल्वर्टमधील सुधारणा करण्याच्या किरकोळ कामांचे कंत्राट मिळवले आहे. या कामाच्या अनुभवाच्या जोरावर मैदानांचा विकास करण्याचे काम या कंपनीला देण्यात अाले आहे. नालेसफाईच्या तसेच बांधकामाच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्यामुळे आता या कंत्राटदारांनी मैदानांच्या विकासकामांकडे मोर्चा वळवला असल्याचेही बोलले जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा