औद्योगिक वसाहतींमध्ये होत असलेल्या जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीसाठी आता पर्यावरण विभागाने महापर्यावरण ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांची, घटनेची प्रत्यक्ष (लाइव्ह) तक्रार करता येणार आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्या या ॲपमुळे दूर होण्यास मदत होणार आहे.
औद्योगिक वसाहतींमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत प्रदूषणावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र सद्यस्थितीत मंडळाकडे असलेले कमी मनुष्यबळ तसेच आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात लागलेला वेळ आदी बाबी लक्षात घेता हे ॲप विकसित करण्यात आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.
या ॲपद्वारे कारखान्यातून होणारे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण याची थेट तक्रार त्रास होणाऱ्या नागरिकांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना वैयक्तिकरित्या करता येणार आहे.
औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रीन, रेड, ऑरेंज अशा श्रेणीत व टप्प्यांमध्ये प्रदूषणकारी कारखाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत. ग्रीन प्रकारच्या अधिसूचनेत असलेल्या कारखान्यांकडून सहजा सहजी प्रदूषण होत नाही.
ऑरेंज प्रकारच्या अधिसूचनेत मध्यम अर्थात वायू व जल प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांचा समावेश आहे, तर रेड प्रकारच्या श्रेणीमध्ये जल, ध्वनी व वायू अशा तीनही प्रकारच्या प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यासह या श्रेणीमध्ये प्रदूषित रासायनिक सांडपाणी व प्रदूषित रासायनिक घातक घनकचरा यांचा समावेश आहे.
अर्थात रेड कॅटेगरीमध्ये येणारे केमिकलयुक्त कारखाने, रसायन प्रक्रियेचे कारखाने, धागा डाय करणारे कारखाने, रसायन घनपदार्थ तयार करणारे कारखाने, लोहनिर्मितीचे कारखाने, धोकादायक वायूंचे उत्सर्जन होणारे कारखाने, धोकादायक कचरा निर्माण होणारे उत्पादन कारखाने, तेल शुद्धीकरण कारखाने, सिमेंट कारखाने, साखर कारखाने, खत कारखाने, रंग आणि रंग-मध्यवर्ती उत्पादक आदींचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा