
मुंबई (mumbai)-पुणे (pune) दृतगती मार्गावर बांधण्यात आलेला केबल स्टेड ब्रिज (cable steady bridge) दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ 45 मिनिटांनी कमी करणार आहे.
जमिनीपासून तब्बल 182 मीटर उंच म्हणजे साधारण 60 मजली इमारतीइतक्या उंचीवर हा पूल बांधण्यात आला आहे.
सह्याद्रीच्या खोल दऱ्यांमध्ये गेली अनेक वर्षे या पुलाचे बांधकाम सुरू आहे. शेकडो कामगार अगदी आपल्या जीवाची बाजी लावून हा पूल उभारण्यासाठी काम करीत आहेत. हा मार्ग आता जवळपास पूर्ण झाला आहे.
या 650 मीटर लांबीच्या या पुलाचे बांधकाम सध्या 95 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम दोन-तीन महिन्यांत पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
यामुळे 2019 मध्ये सुरू झालेला मिसिंग लिंक प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
हा मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण होताच पुण्याहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना घाटातील वाहतूक कोंडीचा (traffic) सामना करावा लागणार नाही.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (highway) देशातील पहिला एक्सप्रेसवे आहे. तो दोन दशकांपूर्वी बांधला गेला. त्या वेळी 13 किमी लांबीच्या ‘मिसिंग लिंक’ची कल्पना मांडली होती. हा प्रकल्प घाट मार्गासाठी एक पर्याय ठरणार होता.
वाढत्या वाहतुकीमुळे पर्यायी मार्गाची गरज भासू लागल्यावर ही जुनी फाईल पुन्हा उघडली गेली. वांद्रे-वरळी सी-लिंक आणि मूळ मुंबई-पुणे एक्सप्रेसवे तयार करणाऱ्या MSRDC वर याची जबाबदारी देण्यात आली.
सह्याद्री घाट विभाग 19 किमी लांब आहे. वळणे, चढ-उतार असल्यामुळे वाहतूक मंद गतीने पुढे सरकते. जड वाहनांमुळे येथे 5 किमीपर्यंतची कोंडी होणं अगदीच सामान्य आहे.
यामुळे या मार्गावर प्रवासाचा वेळ दुपटीहून अधिक वाढतो आणि अपघातांचं प्रमाणही मोठं आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई–पुणे प्रवासात 30 ते 45 मिनिटांची बचत होणार आहे.
हा प्रकल्प आठ लेनचा आहे. प्रत्येक बाजूला चार मार्गिका असतील. यात दोन पूल (त्यांपैकी एक हा केबल-स्टे ब्रिज), दोन बोगदे आणि दोन व्हायडक्ट्स आहेत.
