
ठाणे (thane) शहरात भटक्या श्वानांच्या (stray dogs) वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या ॲनिमल हेल्पलाइनवर तक्रारींची संख्या लक्षणीय वाढली आहे.
गेल्या दोन महिन्यांत एकूण 158 तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. तसेच त्यापैकी बहुतांश तक्रारी श्वानांशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर धाव घेणे, दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे, तसेच काही ठिकाणी घोळक्याने हल्ला करणे अशा घटना वारंवार घडत आहेत.
विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक फटका बसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या आरोग्य व पशुवैद्यकीय विभागाकडून भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण (sterilization) करण्याची मोहीम राबवली जात असली, तरी वाढत्या संख्येमुळे ही उपाययोजना अपुरी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
शहरातील भटक्या श्वानांची संख्या हजारोंच्या घरात पोहोचल्याचा अंदाज असून त्यांच्या वेगाने होणाऱ्या प्रजननामुळे ही समस्या अधिक गंभीर बनत आहे.
नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून ॲनिमल हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
या हेल्पलाइनवर श्वानांच्या हल्ल्यांपासून ते निर्बीजीकरण, लायसन्स तसेच इतर बाबींविषयी तक्रारी व चौकशी नोंदवली जात आहे.
संबंधित विभागाकडून या तक्रारींचे निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एकूणच, भटक्या श्वानांच्या वाढत्या त्रासामुळे ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने ठोस व प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी आता जोर धरत आहे.
हेही वाचा
