Advertisement

सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात डॉक्टरांचा संघर्षाचा पवित्रा


सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात डॉक्टरांचा संघर्षाचा पवित्रा
SHARES

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपचारांचे दर निश्चित करण्यात आले. परंतु, सरकारनं डॉक्टरांना विश्वासात न घेता कोरोना रुग्णालयांचे दर दडपशाही करून ठरवले आहेत. यामुळं छोटी रुग्णालये बंद पडण्याची वेळ आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने (आयएमए) ३ दिवसांत फेरचर्चा करण्याची विनंती केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सरकारच्या निर्णयाविरोधात संघटनेच्या राज्यातील २१६ शाखांमधील ४५ हजार डॉक्टरांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.

कोरोनारुग्णांवर उपचार करताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या स्मरणार्थ ९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता डॉक्टर रुग्णालयांसमोर येऊन १० मिनिटे मूक श्रद्धांजली, तर रात्री ८ वाजता दीप श्रद्धांजली वाहणार आहेत. १० सप्टेंबरला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर शांततामय निदर्शने करण्याबरोबरच आझाद मैदान येथे शांततेत महारॅली काढण्यात येणार आहे. 

'आयएमए'च्या सर्व शाखा या दिवशी सकाळी ११ वाजता मेडिकल काऊन्सिलच्या रजिस्ट्रेशनच्या प्रतिकृतींची होळी करणार असल्याची माहिती मिळते. राज्यातील अनेक नेते व सरकारी अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करून घेतले आहे, त्याचप्रमाणे डॉक्टरांनीसुद्धा आता सामुदायिकरित्या सेल्फ क्वारंटाइन करून घेण्याची वेळ आली आहे.

साथीच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांचा सल्ला न घेता प्रशासकांकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याने अनेक ठिकाणी अपयश येत आहे. ते लपवण्यासाठी खासगी डॉक्टरांवर चिखलफेक करण्यात येत आहे. 'आयसीयू'साठी ठरवलेल्या दरांमध्ये ऑक्सिजन, पीपीई किट्स, बायोमेडिकल वेस्ट चार्जेस, कर्मचाऱ्यांचे पगार, निर्जंतुकीकरणाचा खर्च भागवणे रुग्णालयांसाठी अवघड होत आहे. त्यामुळे राज्यातील २५ हजारपैकी बहुसंख्य रुग्णालये बंद पडण्याची वेळ आली आहे.

आरोग्यमंत्र्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी बैठक घेऊन दर निश्चित करण्याचे ठरले होते. मात्र आरोग्य सचिवांनी ३१ ऑगस्टला परिपत्रक काढून दर कायम ठेवले. हे परिपत्रक अमान्य करत ते फेटाळण्याचा निर्णय 'आयएमए'ने घेतला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा