मुंबईत महापालिकेच्या अखत्यारीत सुमारे २,०५५ किमी रस्ते आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे मागील काही वर्षांपासून सर्वच रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनवण्याकडे पालिकेचा कल वाढतो आहे. दरवर्षी १०० किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाते आहे. येत्या वर्षभरात मुंबईत तब्बल ४९० रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
यामध्ये अधिकाधिक नवीन सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवले जाणार असून, काही भागांत डांबरी रस्त्यांची कामेही होणार आहेत. काही भागांमध्ये आवश्यक तिथे दुरुस्तीकामे केली जाणार आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने निविदा मागवल्या जात आहेत. १ ऑक्टोबरपासून नवीन रस्त्यांची कामे सुरू करण्याचे नियोजन आहे. विकास आराखडा २०३४मध्ये मुंबई शहरामध्ये पडणारा मुसळधार पाऊस आणि सतत वाढणारी वाहतूक याचा विचार करून रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेने रस्ते बांधणीचे नियोजन केले आहे.
पालिकेच्या सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पात रस्तेकामांसाठी तब्बल १८०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या मार्चपासून ऑगस्टपर्यंत सुमारे १२०० कोटींच्या निविदा रस्तेबांधणीसाठी काढण्यात आल्या आहेत. जून आणि जुलैमधील १०० कोटींच्या निविदांचा यामध्ये समावेश आहे. यंदाच्या वर्षी १५७ किमी रस्तेकामे प्रस्तावित असून, त्यात १४५ सिमेंट काँक्रिट आणि १२ किमी डांबरी रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.