अरबी समुद्रातील 'वायू' चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं गेल्यानं त्याचा मुंबईला असलेला धोका ठळला. मात्र, या वादळामुळं वेगानं वाहणारे वारे व पाऊस यामुळं १३ आणि १४ जूनदरम्यान अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसंच या घटनांमध्ये ३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
जोगेश्वरी पूर्वेकडील तक्षशीला सोसायटीमधील इमारत क्रमांक १९ इथं १३ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनिल नामदेव घोसाळकर (४८) हे जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी होली स्पिरिट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र १४ जून रोजीच्या पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर १४ जून रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मालाड पश्चिम येथील नारीयलवाला कॉलनी येथील खासगी कम्पाउंडमधील झाडाची फांदी पडून शैलेश मोहनलाल राठोड (३८) हे जखमी झाले. त्यावेळी जखमी राठोड यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
गोवंडीतील अणुशक्तीनगर परिसरात देखील शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास झाड कोसळून बीआरसीचे कर्मचारी नितीन विष्णू शिरवळकर हे जखमी झाले. त्यांना बीएआरसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून धोकादायक झाडांची छाटणी करण्यात येते. मात्र यंदा मुंबईत मान्सूपूर्व पावासाळा सुरू झाला तरी, काही ठिकाणी झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याशिवाय पालिकेनं देखील पावसाळ्यात झाडांच्या खाली न उभं राहाण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा -
राज ठाकरेंनी कापला ५१ किलोचा ईव्हीएम केक
मुंबई रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार २० नवीन लोकल