अपुरे मनुष्यबळ, खाटा, गैरव्यवस्थापन यामुळे पालिका रुग्णालयांबाबत रूग्णांच्या व नातेवाईकांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापन आणि देखरेखीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयासाठी मदन नागरगोजे, परळच्या केईएम रुग्णालयासाठी अजित पाटील, तर शीव येथील लोकमान्य टिळक सवरेपचार रुग्णालयासाठी बालाजी मंजुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मदन नागरगोजे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००७ च्या तुकडीचे अधिकारी असून ते सध्या राज्य शासनात उपसचिव पदावर कार्यरत आहेत. अजित पाटील हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष २००७ च्या तुकडीचे अधिकारी असून ते सध्या महा-आयटी महामंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर सध्या राज्य शासनाच्या नियोजन विभागात उपसचिव पदावर कार्यरत असणारे बालाजी मंजुळे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष २००९ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
या नवनियुक्त अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक गुरुवारी दुपारी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये असलेल्या सेवासुविधा आणि मनुष्यबळ याविषयी आयुक्तांनी माहिती दिली. तसेच रुग्णालयांच्या अधिक प्रभावी व्यवस्थापनासाठी ही जबाबदारी सोपवली असून त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांबद्दलही आयुक्तांनी सांगितले.धक्कादायक! लाॅकडाऊनमध्ये क्षुल्लक कारणांवरून पत्नीला तोंडी तलाक