Advertisement

लेप्टोने आतापर्यंत घेतले तीन बळी


लेप्टोने आतापर्यंत घेतले तीन बळी
SHARES

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची बॅटिंग सुरू असून ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा आजार बळावत अाहे. जून महिन्यातील पावसाने लेप्टोमुळे ३ जणांचे बळी घेतले आहेत. आतापर्यंत लेप्टोचे ५ रुग्ण आढळले असून त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे.


गेल्या वर्षी लेप्टोचे २० रुग्ण

मागील वर्षी ३० जून २०१७ पर्यंत लेप्टोचे एकूण २० रुग्ण आढळले होते. त्यापैकी एकाचाही बळी गेला नव्हता. मात्र यावर्षी केवळ दोनच दिवसांमध्ये ३ रुग्णांचे बळी गेले आहेत. २६ जूनला प्रथम कुर्ला येथील १५ वर्षीय मुलाचा बळी गेला. त्यानंतर त्याच दिवशी गोवंडीतही २७ वर्षीय तरुणाचा लेप्टोमुळे मृत्यू झाला होता. अाता २७ जूनला मालाड येथील २१ वर्षीय महिलेला लेप्टोमुळे जीव गमवावा लागला अाहे.


रहिवाशांची अारोग्य तपासणी सुरू

लेप्टोच्या या घटनांनंतर कुर्ला, गोवंडी आणि मालाड परिसरातील एकूण १९५६ कुटुंबांची पाहणी करून एकूण ८०२९ रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तापाचे दहा रुग्ण, ७ रुग्ण यूआरटीआयचे तर ४ रुग्ण अतिसाराचे आढळून आले. त्यांना जवळच्या दवाखान्यात पाठवून उपचार करण्यात आले. तसंच या भागात धूम्रफवारणी अाणि औषध फवारणी करून उंदरांची बिळं नष्ट करण्यात आली.


गॅस्ट्रो, मलेरियाच्या रुग्णांतही वाढ

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनीही आता तोंड वर काढलं असून आतापर्यंत गॅस्ट्रोचे ७७९ आणि मलेरियाचे ३५६ रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षी याच कालावधीमध्ये गॅस्ट्रोचे ८८६ आणि मलेरियाचे ४४२ रुग्ण होते. मागील वर्षीच्या तुलने ही संख्या काहीशी कमी असली तरी या आजारांच्या रुग्णांमध्ये तेवढ्याच प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तर काविळीच्या रुग्णांची संख्या ९४ वर पोहोचली आहे.


डेंग्यूचे केवळ २१ रुग्णच

१ ते ३० जूनपर्यंत डेंग्यूचे तसेच डेंग्यूसदृश्य आजारांचे एकूण २९७ रुग्ण महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल होते. परंतु यामध्ये केवळ २१ रुग्ण हे डेंग्यूचे होते. आतापर्यंत जूनमध्ये साथीच्या आजारांनी ४ रुग्णांचे बळी घेतले असून त्यामध्ये लेप्टोस्पायरोसिसचे ३ तर एक डेंग्यूच्या आजारांच्या रुग्णाचा समावेश आहे. मात्र, डेंग्यूचा बळी गेलेला रुग्ण हा उत्तर प्रदेशमधून आलेला होता, असं कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी स्पष्ट केलं.


साथीच्या आजारांबाबत महापालिकेचं आरोग्य विभाग सतर्क असून ज्या-ज्या भागांमध्ये पाणी साचलं होतं, तिथे आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात अाली अाहे. याशिवाय झोपडपट्ट्यांमध्येही अशाप्रकारची आरोग्य तपासणी मोहीम राबवून रहिवाशांमधील साथीच्या आजारांचा शोध घेऊन त्यांचे निदान करण्यात येईल. वेळीच वैद्यकीय उपचार उपलब्ध करून साथीच्या आजारांपासून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं केला जाईल.
- डॉ. अर्चना संजय भालेराव, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा


हेही वाचा -

मुंबईत लेप्टोचा दुसरा बळी

प्राण्यांपासून कसा होतो माणसांना आजार? मुंबई महापालिका घेणार शोध



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा