Advertisement

टोईंगच्या गाड्या महिन्याभरात सोडवा, नाहीतर होणार लिलाव!

महापालिकेने आता मुंबईच्या रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांना दोन दिवसांपेक्षा अधिक थारा न देण्याचा निर्णय घेतला असून ३० दिवसांच्या आत सोडवून न नेल्यास ते लिलावात विकले जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, आपलं वाहन रस्त्यावर उभं करून नसती आफत ओढवून घेऊ नका!

टोईंगच्या गाड्या महिन्याभरात सोडवा, नाहीतर होणार लिलाव!
SHARES

मुंबईच्या रस्त्यांवर जर आपण आपलं वाहन उभं करणार असाल आणि चुकून जर वाहन न्यायला विसरलात. तर दोन दिवसांच्या आत ते वाहन पुन्हा घेऊन जा. नाहीतर आपलं वाहन महापालिकेच्या टोविंग व्हॅनला लटकून चौकीत जाईल. परंतु, महापालिकेने हे वाहन उचलून नेल्यानंतरही जर आपण महिन्याभराच्या आता सोडवलं नाही, तर तुमचं ते महागडं वाहन थेट भंगारात जाणार आहे.


दोन दिवसांत वाहनं उचला!

महापालिकेने आता मुंबईच्या रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांना दोन दिवसांपेक्षा अधिक थारा न देण्याचा निर्णय घेतला असून ३० दिवसांच्या आत सोडवून न नेल्यास ते लिलावात विकले जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, आपलं वाहन रस्त्यावर उभं करून नसती आफत ओढवून घेऊ नका!


नवीन टोईंग व्हॅन आल्या, कारवाई होणार जलद!

मुंबईतील रस्ते, पदपथ तसेच सार्वजनिक जागेत सोडून दिलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्यासोबतच या वाहनांमध्ये जमा होणा-या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे अशा प्रकारे सोडून दिलेली वाहनं महापालिकेच्या वतीने उचलण्यात येतात व नंतर त्यांचा लिलाव केला जातो. आतापर्यंत अशा प्रकारची कारवाई करून वाहने उचलण्यासाठी आवश्यक असणारी टोइंग व्हॅनची सुविधा ही शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एकाच ठिकाणी उपलब्ध असायची. ज्यामुळे वाहन उचलून नेण्याच्या कारवाईवर मर्यादा यायच्या. परंतु, आता सर्व ७ परिमंडळांमध्ये टोईंग व्हॅन उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापलिकेच्या अतिक्रमण निर्मुलन खात्याने घेतला आहे.


आधी नोटीस, मग कारवाई

रस्त्यांवर सोडून दिलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्यावतीने नव्याने धोरण बनवण्यात आलं आहे. त्यानुसार सोडून दिलेल्या वाहनांचे नियमितपणे सर्वेक्षण विभागांच्या देखभाल खात्यातील अभियंत्यांमार्फत करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात जी वाहने आढळून येतील, अशा वाहनांवर महापालिका अधिनियमानुसार नोटीस चिकटवण्यात येईल. त्यानंतर त्यापुढच्या ४८ तासांमध्ये ते वाहन संबंधितांनी उचलून नेले नाही, तर ते वाहन महापालिकेद्वारे उचलून महापालिकेच्या 'गोडाऊन'मध्ये जमा केले जाईल, असे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. टोईंग व्हॅनची संख्या वाढल्यामुळे आणि परिमंडळीय स्तरावर टोईंग व्हॅन उपलब्ध झाल्यामुळे सोडून दिलेले वाहन उचलण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


३० दिवसांत दंड भरा, अन्यथा लिलाव!

महापालिकेने वाहन उचलून नेल्यानंतर त्यापुढील ३० दिवसांपर्यंत संबंधितांना दंड भरुन वाहन सोडवून नेता येणार आहे. मात्र, ३० दिवसांच्या कालावधीदरम्यान वाहन सोडवून न नेल्यास त्या वाहनाचा महापालिकेद्वारे लिलाव केला जाणार आहे. त्यानुसार आपल्या परिसरात एखादे सोडून दिलेले वाहन आढळल्यास त्याविषयीची तक्रार महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे किंवा १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर करता येते. त्याचबरोबर महापालिकेच्या www.mcgm.gov.in अथवा portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत उचलण्यात आलेल्या २ हजार २३५ वाहनांपैकी ३४६ वाहने संबंधितांनी दंड भरुन सोडवून नेली होती. या पोटी महापालिकेला ३० लाख ९६ हजार रुपये एवढा महसूल प्राप्त झाला होता. दंड आणि लिलाव यामुळे या कालावधीत साधारणपणे १ कोटी ६८ लाख २४ हजार एवढी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याचे त्यांनी सांगितले.



हेही वाचा

मालाड टोईंग प्रकरण - महिला आयोगाने मागवला पोलिसांकडून अहवाल

सरदारजींनी केले ट्रॅफिक पोलिसाला नामोहरम! व्हिडिओ व्हायरल!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा