मालाड टोईंग प्रकरण - महिला आयोगाने मागवला पोलिसांकडून अहवाल


SHARE

मालाड येथे गाडीत महिला स्तनपान करत असताना गाडी टो केल्याच्या प्रकरणाची आता गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. त्यानुसार 'पुढच्या सात दिवसांत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा' असे पत्र आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांना पाठवले आहे.


व्हायरल व्हिडिओमधून महिलेचं पितळ उघडं

शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. गाडीमध्ये राखी माळी ही महिला आपल्या मुलाला स्तनपान करत असताना पोलिसांकडून गाडी टो केली जात असल्याचा हा व्हिडिओ होता. राखी माळी गाडीत मुलाला स्तनपान करत असताना पोलिस गाडी टो करूच कसे शकतात? असा सवाल करत पोलिसांकडे बोट दाखवले गेले. मात्र त्यानंतर यासंबंधीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओने राखी माळीचे पितळं उघडे केले.

दुसऱ्या व्हिडिओनुसार ज्यावेळी गाडी प्रत्यक्षात टो केली जात होती, त्यावेळी बाळ राखी माळीच्या नवऱ्याच्या हातात होते. पोलिसांनी जेव्हा गाडी टो करण्यास सुरूवात केली, तेव्हा बाळ राखी माळीच्या हातात देण्यात आल्याचे या व्हिडिओतून समोर आले नि या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले.


स्वत:ला वाचवण्यासाठी बाळाचा जीव धोक्यात

केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही या प्रकरणाची दखल घेत राखी माळीलाच टार्गेट केले होते. स्वत:ला वाचवण्यासाठी बाळाचा जीव धोक्यात घालणाऱ्या राखी माळीविरोधातच चौकशी आणि कारवाई व्हावी, असे मतही व्यक्त केले होते. या मागणीपाठोपाठ राज्य महिला आयोगाने आता पोलिसांना पत्र पाठवत यासंबंधीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तर या अहवालानंतरच राज्य महिला आयोग आपली भूमिका स्पष्ट करेल आणि पुढील कारवाई करेल, अशी माहिती रहाटकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.हेही वाचा

चायनीज नीट न झाल्याचा जाब विचारला, 'त्याने' उकळतं तेल अंगावर फेकलं!


संबंधित विषय