Advertisement

अंधाऱ्या आदिवासी पाड्यात पेटवली ज्ञानाची ज्योत!


अंधाऱ्या आदिवासी पाड्यात पेटवली ज्ञानाची ज्योत!
SHARES

आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत आजही अनेक ठिकाणं विकासापासून वंचित आहेत. यापैकीच एक म्हणजे मुंबई आणि उपनगर परिसरात असलेले आदिवासी पाडे. मुंबईतील आदिवासी समाज हा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आणि मागासलेला आहे. सरकारने या आदिवासी पाड्यांसाठी अनेक योजना आखल्या. परंतु, या योजना अजूनही गरजूंपर्यंत पोहोचल्याच नाहीत. कधीकाळी स्वावलंबी असलेला हा आदिवासी समाज आता धुणी-भांडी, मोलमजुरी करून आपलं पोट भरत आहे. त्यात विकासाच्या नावाखाली शहरं देखील या पाड्याच्या दिशेने अतिक्रमण करत आहेत.

या मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात शिक्षणापासून वंचित असलेल्या आदिवासी समाजाला साक्षरतेकडे नेण्यासाठी एक महिला झटते आहे. त्यांचे नाव आहे कुमुद मिश्रा.



कोण आहेत कुमुद मिश्रा?

प्राध्यापक असलेल्या कुमुद मिश्रा या घटकोपरमधील झुनझुनवाला महाविद्यालयात फिजिक्स हा विषय शिकवतात. परंतु, आपला शिक्षकी पेशा चार भिंतींपर्यंत मर्यादित न ठेवता त्यांनी आपल्या शिक्षणाचा फायदा समाजातील इतर घटकांना व्हावा, याच धारणेतून त्या २०१५ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सानिध्यात असलेल्या पळस पाड्यात आल्या. इथल्या परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी या पाड्याच्या विकासाची नस ओळखली. शिक्षणाच्या माध्यमातून या आदिवासी पाड्याची पुढची पिढी घडवण्याचे काम कुमुद मिश्रा यांनी हाती घेतला. परंतु त्यांच्या समोर अडचणीही तितक्याच होत्या.  

अखेर या पाड्याला स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांच्यात शिक्षणाची बीजं रोवण्यासाठी या पाड्यात कुमुद मिश्रा यांच्या रूपाने जणू एक सरस्वतीच अवतरली.



पळसपाड्यातील आदिवासी समाजाला केले साक्षर

मुलुंड शेजारी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पळस पाड्यातील बहुतेक आदिवासी हातभट्टीच्या दारूच्या आहारी गेले होते. याचा परिणाम मुलांवरही होत होता. याची माहिती कुमुद यांना मिळाल्यानंतर त्यांनी हातभट्टीची दारू बंद करण्याची मोहीम सुरू केली. त्यानंतर पालकांना विश्वासात घेऊन त्यांनी लहान मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु, सुरुवातीला कुमुद यांच्यावर विश्वास ठेवण्यास कुणीच तयार नव्हते. तरीही कुमुद यांनी माघार घेतली नाही.


त्यांनी याच पाड्यात राहणाऱ्या एका महिलेला हाताशी धरून तिच्या माध्यमातून इथल्या लोकांशी संवाद साधला. ही महिला म्हणजे कुमुद यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी सहकारी शकुंतला दडवी या आहेत. त्या रोज पाड्यात जाऊन मुलांना चावडीवर गोळा करायच्या. सुरवातीला त्यांना पालकांच्या रोषाला देखील सामोर जावे लागत होते. परंतु, पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिल्यानंतर पालकांनी आपल्या मुलांना बालवाडीत पाठवायला सुरुवात केली. काही मुलांना पालक त्यांच्या कामात मदत करण्यासाठी नेत असत. त्यामुळे काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पालकांना महिनाभराचे रेशन देणं सुरू केलं. त्यानंतर पालकांनी आपली मुले बालवाडीत सोडण्याची तयारी दर्शवली.

सुरुवातीला बालवाडीला छप्पर नव्हतं, भिंती नव्हत्या. ना कुठली खेळणी. परंतु, तरीही या बालवाडीतील प्रत्येक मूल हे शिक्षणाच्या ओढीने येत गेलं.

कुमुद मिश्रा, प्राध्यापिका

पळस पाड्यातील चावडी ते इथली बालवाडी हे अंतर अवघ्या दोन मिनिटांचं. परंतु, ते गाठण्यासाठी कुमुद यांना तब्बल 2 वर्ष घालवावी लागली. सध्या कुमुद यांच्या बालवाडीत 3 सत्र चालतात. त्यांच्या सहकारी शकुंतला दडवी या सध्या ही बालवाडी चालवत आहेत.



मी  देखील याच पाड्यात लहानाची मोठी झाले. परंतु, मी भोगलेलं आयुष्य पुढच्या पिढीला मिळायला नको, म्हणून शिक्षण घेऊन पाड्यापासून दूर न जाता आता कुमुद मिश्रा यांच्यासोबत या मुलांना शिक्षण देण्याचं काम सुरू केलं आहे.

शकुंतला दडवी, कुमुद यांच्या सहकारी

कुमुद मिश्रा आणि शकुंतला यांचा इथल्या मुलांना इतका लळा लागला आहे, की या मुलांना आता बालवाडीची ओढ लागायला सुरुवात झाली आहे.


स्वखर्चाने सुरू केल्या बालवाड्या

मुलुंडच्या आदिवासी पाड्यापर्यंत मर्यादित न रहाता कुमुद मिश्रा यांनी कळवा आणि मानखुर्द या ठिकाणी देखील स्वखर्चाने बालवाड्या सुरू केल्या आहेत. त्यांच्या शिकवणीमुळ अाता अनेक मुले नियमित शाळेत जाऊ लागली आहेत. एखादा विद्यार्थी घडवायला चार भिंती, बेंच, नवी कोरी पुस्तके लागत नाहीत, तर लागते ती फक्त जिद्द! याच जिद्दीवर कुमुद मिश्रा यांनी आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षणाची कास धरून समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा चंग बांधला आहे.

गेली १५ ते २० वर्ष कुमुद मिश्रा याचप्रमाणे विविध आदीवासी पाड्यांमधे जाऊन विद्यादानाचे काम करत आहेत, तेही सरकारकडून कुठलीही अपेक्षा न बाळगता. त्यांचा या बालवाडीतून शिक्षणाची आवड निर्माण झालेल्या अनेक विध्यार्थ्यांनी यशाची उंच शिखरं गाठली आहेत. हीच कुमुद मिश्रा यांच्या प्रयत्नांची पोचपावती आहे.



हेही वाचा - 

कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाड्यांमधील आरक्षणे उठणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा