..आणि पालिकेचे 5 कोटी रुपये भाजपने वाचवले!

  BMC
  ..आणि पालिकेचे 5 कोटी रुपये भाजपने वाचवले!
  मुंबई  -  

  कांदिवलीतील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाच्या बांधकामात तब्बल पाच कोटी रुपये वाचवण्यात पालिकेतील पहारेकरी असलेल्या भाजपाला यश आले आहे. 

  स्विमिंग पूलच्या बांधकामात भूमिगत वाहनतळाचा समावेश करण्यात आला होता. याला भाजपाने विरोध दर्शवून हा खर्च अनाठायी असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेतला होता. परंतु आता वाहनतळासह लग्नासाठी स्टेज, सौरऊर्जा व्यवस्था आदींचे काम वगळून सुधारीत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली असून यामुळे महापालिकेचा 5 कोटी रुपयांचा खर्च वाचला आहे.

  कांदिवली पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव बंद झाल्यामुळे याचा विकास करण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्थायी समितीला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यामध्ये ऑलिंम्पिक दर्जाच्या स्विमिंग पूलसह भूमिगत वाहनतळ, प्रशासकीय  इमारत,  कर्मचारी निवासर, लग्न इत्यादीसाठी स्टेज, अंतर्गत व्यायामशाळा, सीसीटीव्ही कॅमेरे, उद्यान विषयक कामे आदींसाठी 36.34 कोटींच्या कामांसाठीचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे आला होता. मात्र, यामध्ये सुधारणा करुन हे कंत्राट आता 31.21 कोटी रुपयांना जुन्याच अर्थात शेठ कन्स्ट्रक्शन कंपनीलाच देण्यात आले आहे.


  भूमिगत वाहनतळाला विरोध

  स्विमिंग पूलच्या या विकासात भूमिगत वाहनतळाच्या बांधकामाला भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी विरोध दर्शवला होता. भूमिगत वाहनतळासाठी पाच कोटींचा होणारा खर्च अनाठायी असून हे काम वगळण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त आय.ए.कुंदन यांनी हा प्रस्ताव मागे घेतला होता.


  भूमिगत ऐवजी पुष्ठभागावर वाहनतळ

  या प्रस्तावाची पुन:पडताळणी करुन यातून भूमिगत वाहनतळाचे काम, डायविंग तलाव, सार्वजनिक समारंभासाठी तसेच लग्न इत्यादींसाठी असलेले स्टेजचे काम व सौरऊर्जा व्यवस्था करण्याचे काम वगळण्यात आले आहे. येणाऱ्या वाहनांसाठी पृष्ठभागावरच वाहनतळाची सोय केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.


  टेनिस आणि बॉस्केट बॉल कोर्ट

  भूमिगत वाहनतळासह अन्य कामे वगळतानाच नवीन आराखड्यात एक टेनिस कोर्ट व बास्केट बॉल कोर्टची कामे नव्याने हाती घेण्यात येणार आहेत.


  भाजपालाच मोठा धक्का बसणार होता

  या जलतरण तलावासाठी भाजपाच्या स्थानिक नगरसेविका शैलजा गिरकर यांनी पाठपुरावा केलेला असून स्थायी समितीत त्या गैरहजर असताना या प्रस्तावाला भाजपाने विरोध करुन प्रशासनाला तो मागे घ्यायला लावला होता. एकदा प्रस्ताव मागे घेतल्यानंतर तो पुन्हा समितीपुढे आणण्यास विलंब केला जातो. परंतु, शैलजा गिरकर यांनी याप्रकरणी पुढाकार घेऊन कोणत्याही परिस्थित जलतरण तलावाचे काम व्हायला हवे, यासाठी आग्रह धरला. त्यामुळे अखेर भाजपानेच विरोध केलेल्या कामांपैकी ही कामे वगळून सुधारीत प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात आला. याला भाजपाचे मनोज कोटक, प्रभाकर शिंदे यांच्यासह सर्वांनी पाठिंबा दिल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.  हेही वाचा

  कांदिवलीतील तरण तलावाच्या कामाचा प्रस्ताव भाजपानेच रोखला  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.