11 दिवसांत 5500 गिरणी कामगारांचे घरांसाठी अर्ज

 Mumbai
11 दिवसांत 5500 गिरणी कामगारांचे घरांसाठी अर्ज

गिरण्यांच्या जमिनीवरील मालकी हक्काच्या घराच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी याआधी ज्या गिरणी कामगारांनी अर्ज भरलेला नाही, अशा गिरणी कामगारांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यानुसार मागील अकरा दिवसांत सुमारे 5500 गिरणी कामगारांनी अर्ज भरल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली आहे.

अर्ज भरण्यासाठी केवळ 21 दिवस उरल्याने उर्वरीत कामगारांनी त्वरीत अर्ज भरावेत, असे आवाहन गिरणी कामगार संघटना आणि नेत्यांकडून करण्यात येत आहे.

याआधी सुमारे 1 लाख 48 हजार गिरणी कामगारांनी म्हाडाकडे अर्ज भरले होते. त्यापैकी केवळ 12 गिरणी कामगारांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनेक गिरणी कामगार या योजनेपासून केवळ अर्ज न भरल्याने दूर होते. त्यामुळे अशा कामगारांना आणखी एक संधी देण्याची मागणी होत होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने यासंबंधीचा निर्णय दिल्याने म्हाडाने 26 मेपासून आॅनलाईन अर्ज भरून घेण्यास सुरूवात केली आहे.

आॅनलाईन प्रक्रिया असल्याने कामगारांना अर्ज भरण्यात अडचणी येत असल्या, तरी हळूहळू कामगार अर्ज भरण्यास प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत 5500 गिरणी कामगारांनी अर्ज भरले आहेत. कामगारांना 27 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

Loading Comments