Advertisement

शाळा आणि एनजीओमध्ये खंडणीनाट्य


शाळा आणि एनजीओमध्ये खंडणीनाट्य
SHARES

मुंबई - शाळेतील फी वाढीचे प्रकरण दडपण्यासाठी शाळेकडून 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करत दहिसरमधील एका शाळेने शैक्षणिक क्षेत्रातील एका स्वयंसेवी संस्थेविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. संस्थेने मात्र उलट शाळेवरच आरोप लावले आहेत. शाळेने आपला इमेल हॅक करून खोटे इमेल पाठवत शाळेविरोधातलं आंदोलन बंद पाडण्याचा कट रचल्याचा आरोप संस्थेने केला आहे. शाळा आणि संस्थेमधील या आरोप-प्रत्यारोपांमुळे शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे.

दहिसर येथील युनिव्हर्सल शाळेकडून भरमसाठ फी वाढवली जात असल्याची तक्रार काही पालकांनी फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन संस्थेकडून केली. त्यानुसार पालक आणि फोरमने या फी वाढीविरोधात आवाज उठवण्यास सुरूवात केली. असे असताना गेल्या आठवड्यात 27 मार्च रोजी दहिसर पोलीस ठाण्यात शाळेकडून फोरमविरोधात 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार फोरमने ई-मेलद्वारे शाळा प्रशासनाकडे फी वाढीविरोधात हे प्रकरण बंद करण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. 

'मुंबई लाइव्ह'ने शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता फोरमने याआधीही अऩेक शाळांमधील पालकांना शाळा प्रशासनाविरोधात फितवत शाळांना ब्लॅकमेल करायचे आणि मग त्यांच्याकडून खंडणी मागायची असे प्रकार केले आहेत. पण या शाळांनी पुढे येऊन फोरमविरोधात तक्रार दाखल केली नाही. ती हिंमत आम्ही दाखवली आणि फोरमविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तर फोरमचे अध्यक्ष जयंत जैन यांनी मात्र आपल्यावरील आणि फोरमवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. फोरमचा ई-मेल 26 मार्च रोजी रात्री 2 वाजता हॅक करत त्यावरून ई-मेल पाठवण्यात आला असून, ई-मेल हॅक करण्याचा प्रकार शाळा प्रशासनानेच केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ई-मेल हॅक केल्याबरोबर गुगलकडून ई-मेल हॅक झाल्याचा अलर्ट मेसेज आला असून, यासंबंधी सायबर सेलकडे फोरमने तक्रार केली आहे. तर शाळेविरोधात दादर पोलीस ठाण्यात फोरमने तक्रार दाखल केल्याचेही जैन यांनी सांगितले आहे. दहिसर पोलीस ठाण्यात अशी तक्रार दाखल झाली असून, याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक सुभाष सावंत यांनी दिली आहे. तर सायबर सेलकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुढे काय वळण घेते याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा