Advertisement

प्राण्यांपासून होणाऱ्या रोगांसाठी महापालिकेची प्रयोगशाळा!


प्राण्यांपासून होणाऱ्या रोगांसाठी महापालिकेची प्रयोगशाळा!
SHARES

प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या रोगांच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेसह अद्ययावत निदानसुविधा असलेला प्राण्यांचा दवाखाना महापालिकेकडून बनवण्यात येत आहे. पाळीव प्राण्यांच्या किंवा भटक्या जनावरांच्या आरोग्याच्या अनुषंगाने अथवा रोगांवर उपचार करण्यासाठी सध्या महापालिकेचा एकमेव पशुवैद्यकीय दवाखाना खार येथे आहे. हा दवाखाना आता अद्ययावत करून तिथे प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या रोगांच्या निदानाकरिता प्रयोगशाळाही उभारण्यात येणार आहे.


पशूंमुळे होतात ३०० हून अधिक आजार!

साधारणपणे माणसाला होणाऱ्या आजारांपैकी ३०० हून अधिक आजार हे पशूंचे निकृष्ट दर्जाचे मांस, निकृष्ट दर्जाचे प्राणीजन्य पदार्थ, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादींपासून होत असतात. यामध्ये लेप्टोस्पायरोसिस, रॅबिज, अॅन्थ्रॅक्स, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू यासारख्या आजारांचा समावेश होतो. प्राण्यांपासून माणसाला होणाऱ्या आजारांना 'झूनॉटिक डीसीजेस' असे म्हटले जाते.


पाळीव प्राण्यांची वाढती संख्या

२०१२ मध्ये करण्यात आलेल्या एकोणिसाव्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ४० हजार ५९८ कुटुंबांमध्ये पाळीव प्राणी आहेत. ही संख्या वाढत्या शहरीकरणाबरोबर आणि वाढत्या लोकसंख्येसोबत वाढत आहे. याव्यतिरिक्त भटक्या जनावरांची संख्या देखील मोठी आहे.


माहितीच्या सूसूत्रीकरणावर भर देणार

महापालिकेच्या खार येथील दवाखान्यासह महापालिका क्षेत्रातील खाजगी पशुवैद्यकांकडून पाळीव प्राण्यांवर आवश्यक ते उपचार केले जातात. मात्र, संसर्गजन्य आजारांबाबतची वा अन्य माहिती देण्यासाठी महापालिकेकडे ठोस यंत्रणा नसल्याने व खाजगी पशुवैद्यकांकडून याबाबतची माहिती उपलब्ध होत नसल्याने या प्रकारची यंत्रणा आवश्यक झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आता महापालिकेकडून पशुवैद्यकीय सेवांचे सुसूत्रीकरण करुन परिमंडळीय स्तरावर देखील सेवा देण्याचा विचार केला जात आहे.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय सेवा प्रथमच परिमंडळीय स्तरावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सदर सेवेअंतर्गत मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी श्वान निर्बिजीकरण व नियंत्रण कार्यक्रमावर प्रत्यक्ष देखरेख, भटक्या श्वानांना रॅबिज प्रतिबंधक लसीकरण करणे, पाळीव श्वानांचा परवाना देणे इत्यादी सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा