Advertisement

मुंबईतील धरण, तलाव होणार पर्यटनस्थळ

मुंबई महापालिकेनं (BMC) मुंबईला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या तलावक्षेत्रांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबईतील धरण, तलाव होणार पर्यटनस्थळ
SHARES

मुंबईतील पर्यटनस्थळांमध्ये (Tourist destination) आता आणखी वाढ होणार आहे. कारण, मुंबई महापालिकेनं (BMC) मुंबईला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या तलावक्षेत्रांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेत 'विशेष पर्यटन विभाग' (Special Tourism Department) स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळं आता पर्यटकांना मुंबईतील धरणांची (Dam) तलावांची (Lakes) सहल करणं पर्यटकांना शक्य होणार आहे.

मुंबईला ७ तलावांमधून दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हे तलाव नेमके कुठे आहेत, याची अनेक मुंबईकरांना माहिती नाही. सुरक्षेच्या कारणांमुळं सामान्य नागरिकांना तलावक्षेत्रात प्रवेशबंदी आहे. महापालिकेनं आता तानसा, वैतरणा व मोडकसागर तलावक्षेत्रात पर्यटन उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई शहरापासून १०० ते १२० किमीवर ठाणे जिल्ह्यात असलेल्या निसर्गरम्य परिसरातील तलावांची सहल करणे मुंबईकरांना शक्य होणार आहे. त्यासाठी पर्यटनक्षेत्रातील तज्ज्ञ व ट्रॅव्हल एजन्सीचे सहाय्य घेतले जाणार आहे.

महापालिकेच्य या निर्णयामुळं ब्रिटिश काळात उभारण्यात आलेल्या तानसा तलावासह अन्य तलावांना भेटी देणे शक्य होणार आहे. त्याशिवाय, इथं असणाऱ्या पुरातन वास्तूचं नूतनीकरण करून तेथे पर्यटकांना विश्रांती करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या अतिथीगृहाला नवीन लकाकी देण्यात येणार आहे. या भागात सायकल टूर, नेचर ट्रेल, बर्ड वॉचिंग, स्टार गेझिंग, नॉन मोटरराइड वॉटर स्पोर्ट्स, कॅम्पिंग यांसारख्या उपक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याचं महापालिकेने यंदाच्या अर्थसकंल्पात म्हटलं आहे.

तलावक्षेत्रांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र पर्यटन विभाग विकसित करण्यात येणार आहे. या पर्यटनस्थळांच्या प्रमुखाची नियुक्ती महापालिकेतील अधिकाऱ्यांमधून केली जाणार आहे. मात्र दैनंदिन कामकाज बाह्य विशेषज्ञ आणि ट्रॅव्हल्स एजन्सीचं सहाय्य घेऊन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळं मुंबईकरांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका जी कामे पार पाडते, त्याबद्दल माहिती मिळणार आहे. एप्रिल २०२० नंतर येथील परिसराचा अभ्यास करून पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईचा समृद्ध इतिहास आणि शहराचा वारसा याबाबतची माहिती मुंबईकर तसेच देश-विदेशातील पर्यटकांना मिळावी यासाठी मुंबईचा इतिहास सांगणाऱ्या सहली आणि आणि उपक्रमांचे आयोजन येत्या काळात केले जाणार आहे. हा वारसा सांगण्यासाठी मुंबईतील ऐतिहासिक जुने रस्ते, ठिकाणे, इतिहास, नैसर्गिक वारसा, ऐतिहासिक बांधकामे यांची चित्रफीतही तयार केली जाणार आहे. या कामांसाठी संबंधित क्षेत्रातील विशेषज्ज्ञ आणि एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत मुंबईकरांसाठी विविध सहली आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या भायखळा, सीएसएमटी स्थानकातील पूल बंद

'काळा घोडा फेस्टिव्हलला' या ५ कारणांसाठी भेट द्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा