Advertisement

...इथले रहिवासी पाण्यासाठी झिजवतायेत पालिकेच्या पायऱ्या


...इथले रहिवासी पाण्यासाठी झिजवतायेत पालिकेच्या पायऱ्या
SHARES

पाण्याशिवाय जीवन नाही असे कायम म्हटले जाते. मात्र याच पाण्यासाठी गेल्या वर्षभरापासून पालिकेच्या पायऱ्या झिजवल्या जात आहेत. हा सर्व प्रकार कुठल्या खेड्यापाड्यातील नाही, तर मायानगरी मुंबईतला आहे. आजवर विदर्भ किंवा खेड्यापाड्यातील लोक पाण्यासाठी पायपीट करत असल्याचे आपण ऐकले असेल. मात्र मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील आंबोली परिसरात गोपिका इमारतीमध्ये राहणारे रहिवासी गेल्या वर्षभरापासून पुरेसे पाणी मिळावे यासाठी पालिकेच्या पायऱ्या झिजवत आहेत.


अनेकदा निवेदने देऊनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

आंबोली येथील गोपिका इमारतीतील रहिवासी गेल्या वर्षभरापासून पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. या संदर्भात अनेकदा सोसायटीच्या सेक्रेटरी तसेच रहिवाशांनी पालिकेच्या के. वेस्ट विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र त्यांच्या निवेदनाला चक्क केराची टोपली दाखवल्याचे चित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे या गोपिका इमारतीमध्ये पूर्वी पहाटे 6 वाजता पाणी येत असे ते दुपारी 3 ते 4 ला जात असे. मात्र आता साडे आठ वाजता येणारे पाणी 10 वाजेपर्यंत असते आणि या पाण्याचा फोर्स देखील फार कमी असतो. ही परिस्थिती गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रारी देऊन संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करण्याचा प्रयत्न देखील इथले रहिवासी करतात. मात्र तक्रारीची दखल तर सोडा संबधित अधिकारी फोन उचलण्याची तसदी देखील घेत नसल्याचे इथल्या रहिवाशांचे म्हणणे आहे.

4 मजली असलेल्या गोपिका इमारतीमध्ये एकूण 10 कुटुंब राहतात. 10 हजार लिटर पाणी पुरवण्याची क्षमता असलेल्या या इमारतीला आता फक्त एक हजार लिटर पाणीच येते. त्यामुळे पाण्याचा दाब आपोआपच कमी झाला आहे. इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या चाळींमध्ये देखील सुरुवातीला अशीच अवस्था होती. मात्र आता तिकडे पाणीपुरवठा नियमित होतो.

ही इमारत 1985 साली उभी राहिली. सुरुवातीला पाणी पुरवठा योग्य प्रकारे केला जात असे, मात्र वर्षभरापासून हे रडगाणं सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला. मात्र आश्वासनाखेरीज आमच्या पदरी काहीच पडले नाही. विशेष म्हणजे चीफ इंजिनिअर ननावरे यांना आम्ही वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी एकदाही फोन उचलण्याचे कष्ट घेतले नाहीत.

प्रतिमा निकम, रहिवासी

दरम्यान याबाबत 'मुंबई लाइव्ह'ने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी आम्हाला एक आठवडा द्या, आम्ही नवीन सिस्टीम बसवत आहोत. लवकरच पाण्याची समस्या दूर होईल असे सांगितले.



हेही वाचा -

पवईत 24 तास पाणीपुरवठा बंद

मेट्रो- ३ च्या कामाची कृपा... चर्चगेटमधील रहिवाशांना केमिकलयुक्त पाणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा