Advertisement

शिवसेना भवनजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली


शिवसेना भवनजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली
SHARES

मेट्रो रेल्वेच्या कामामुळे पुन्हा एकदा दादरमध्ये जलवाहिनी फुटली असून यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले आहे. एक महिन्यांपूर्वी सेना भवन जवळ मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनी फुटली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा शनिवारी ही जलवाहिनी फुटण्याची घटना घडली. मात्र, तात्काळ जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करून पर्यायी जलवाहिनीतून पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

पर्यायी जलवाहिनीमुळे दादर, प्रभादेवी, लोअर परळ आदी भागांमध्ये पाणी पुरवठा बंद होण्याचं संकट टळलं. जलवाहिनी फुटल्याने या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये अघोषित पाणी कपातीची झळ सोसावी लागणार आहे.



१८ इंचची जलवाहिनी 

दादर पश्चिम येथील शिवसेना भवन जवळ गोखले रोडवर मेट्रोचे काम सुरू असताना शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास १८ इंच व्यासाची जलवाहिनी फुटण्याची घटना घडली. जलवाहिनी फुटल्यानंतर उंचच उंच तुषार उडून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. ही जलवाहिनी फुटल्यामुळे जी दक्षिण विभागातील ना.म.जोशी मार्ग आणि प्रभादेवी, दादर तसेच शिवाजीपार्क येथील पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.


मुख्य जलवाहिनी 

या भागाला पाणी पुरवठा करणारी ही मुख्य जलवाहिनी असून या भागात संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी पुरवठा सुरु असल्यामुळे जलवाहिनी फुटून मोठ्याप्रमाणात पाणी वाहून गेले. परंतु या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करून ती रिकामी करून तात्पुरते दुरुस्तीचे काम करण्यात आले आणि पर्यायी जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. 

 या भागात पाणी पुरवठा बंद झालेला नसून केवळ दाब कमी केल्यामुळे कमी दाबाने हा पुरवठा सुरु करण्यात आल्याची माहिती जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांनी दिली आहे. आता मुख्य जलवाहिनीचे काम सहायक अभियंता (जलकामे व दुरुस्ती) यांच्या देखरेखीखाली केले जाणार आहे.


हेही वाचा - 

अंधेरी दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर यांचा मृत्यू

गिरण्यांच्याच जागेवर की पनवेलमध्ये घर हवंय? पनवेलमधील विजेत्यांना विकल्प




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा