Advertisement

बोगस पॅथाॅलाॅजी लॅबला दणका कधी?


बोगस पॅथाॅलाॅजी लॅबला दणका कधी?
SHARES

स्टेण्टच्या नावे होणारी ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत स्टेण्टच्या किंमती कमी केल्या. तर दुसरीकडे रूग्णांना स्वस्त औषधे उपलब्ध व्हावीत
म्हणून जेनेरिक औषधे लिहून देणेही डाॅक्टरांना बंधनकारक केले आहे. मात्र त्याचवेळी आजाराचे निदान करणाऱ्या पॅथाॅलाॅजी लॅबकडे केंद्र आणि राज्य सरकार दोघांचेही दुर्लक्ष होत आहे.

पॅथाॅलाॅजी क्षेत्रावर सरकारी नियंत्रण नसल्याने बोगस पॅथाॅलाॅजी लॅब आणि पॅथाॅलाॅजिस्टचा मुंबईसह देशभरात सुळसुळाट झाला आहे. हे बोगस पॅथॉलॉजिस्ट आणि लॅबचालक रूग्णांची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने या क्षेत्रातील फसवणुकीकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस धोरण आखून हे क्षेत्र नियंत्रित करावे, अशी मागणी आता पॅथाॅलाॅजी संघटनांकडून होत आहे.

औषध खरेदी-विक्री, उत्पादनाकरीता डाॅक्टरांसाठी नोंदणी-परवाना बंधनकारक असून या नोंदणीची जबाबदारी निश्चित यंत्रणांवर टाकण्यात आली आहे. त्याचवेळी पॅथाॅलाॅजी लॅबसाठी नोंदणी हा प्रकारच नाही. त्यामुळे कुणीही, कुठेही या पॅथॉलॉजी लॅब थाटत रूग्णांची आर्थिक लूट करत आहेत.


हेही वाचा

बोगस पॅथॉलॉजिस्ट, डॉक्टरांचा सुळसुळाट

'बोगस पॅथालॉजिस्टना रोखण्याचे काम आमचे नाही'


'महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथाॅलाॅजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलाॅजिस्ट' ही संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून बोगस लॅब आणि बोगस पॅथालाॅजिस्टला आळा घालण्याची मागणी करत राज्य सरकारसह केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सरकार याकडे कानाडोळा करत असल्याने बोगस पॅथाॅलाॅजिस्टचे फावत असल्याचा आरोप
या संघटनेचे अध्यक्ष डाॅ. संदीप यादव यांनी केला आहे.

नोंदणी नसल्याने या पॅथाॅलाॅजी लॅबविरोधात कारवाई कुणी करायची? यावरही मतमतांतरे आहेत. अन्न आणि औषध प्रशासन, पालिका की आरोग्य विभाग यापैकी कुणी या लॅबवर कारवाई करायची यासंबंधीचा कुठलाही कायदा नसल्याने सर्वत्र सावळागोंधळ माजला आहे.

पॅथाॅलाॅजी लॅब चालवण्याचे अधिकार कुणाला आहेत? यासह अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी सरकारने डॉ. पी. टी. वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादरही केला. पण या अहवालाचे पुढे काय झाले हा एक प्रश्नच असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. केंद्र सरकार आरोग्य क्षेत्राकडे लक्ष देत असताना याच क्षेत्रातील पॅथाॅलाॅजी लॅब घटकाकडेही आता केंद्रासह राज्याने लक्ष देत रुग्णांची फसवणूक करणाऱ्यांना दणका द्यावा, अशी आशा संघटनेसह जनआरोग्य चळवळीकडून होत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा