Advertisement

देश शोकसागरात आणि भाजपा नेत्यांचं फोटोसेशन

भाजपाच्या चमकेश नगरसेवकांनी गोरेगावचा पूल शुक्रवारी सकाळी खुला करून देताना तिथं उपस्थिती लावून चक्क फोटोसेशन केलं. त्यामुळे अटलजींच्या निधनाच्या दु:खापेक्षा भाजपाला श्रेय लाटण्यात अधिक रस असल्याचं दिसतंय.

देश शोकसागरात आणि भाजपा नेत्यांचं फोटोसेशन
SHARES

 गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपुलाच्या विस्तारीत पुलाचं उद्घाटन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढं ढकलण्यात आल्याचं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलं. त्यानंतर अटलजींच्या निधनाचं अधिकृत वृत्त येऊन धडकलं. त्यामुळे संपूर्ण देश अटलजींच्या शोकसागरात बुडालेला अाहे.

मात्र, अापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या मृत्यूचं सोयरसुतक भाजपाच्या नगरसेवकांना नसल्याचं दिसून येत अाहे. भाजपाच्या चमकेश नगरसेवकांनी गोरेगावचा पूल शुक्रवारी सकाळी खुला करून देताना तिथं उपस्थिती लावून चक्क फोटोसेशन केलं. त्यामुळे अटलजींच्या निधनाच्या दु:खापेक्षा भाजपाला श्रेय लाटण्यात अधिक रस असल्याचं दिसतंय.


गुरूवारी दुपारी उद्घाटन रद्द

गोरेगाव पश्चिम येथील वीर सावरकर उड्डाणपुलाच्या विस्तारीत पूलाचं काम पूर्ण झालं असून याच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि भाजपात वाद सुरु होता. त्यामुळे या पुलाचं उद्घाटन महापालिकेच्यावतीनं शुक्रवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते होणार होतं. परंतु गुरुवारी सकाळपासून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने, हे उद्घाटन पुढे ढकलून पुल लोकांसाठी शुक्रवारपासूनच सुरु करण्यात यावा, असे निर्देश महापौरांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले होते.


नगरसेवकांसह कार्यकर्ते उपस्थित

शुक्रवारी सकाळी दहा वाजता महापालिकेच्या पूल विभागाचे अधिकारी व वाहतूक पोलिस यांच्या उपस्थितीत पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात अाला.  परंतु पूल सुरू करताना पी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल यांच्यासह राजुल देसाई, श्रीकला पिल्ले तसेच भाजपाचे पदाधिकारी समीर देसाई यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते हे रहिवाशांसह तिथे दाखल झाले. या सर्वांच्या उपस्थितीत पुल खुला करण्यात आला.


शिवसैनिकांनी फिरकू नये

अटल बिहारी यांच्या निधनामुळे सात दिवस दुखवटा जाहीर करण्यात अाला अाहे.  त्यामुळे सर्वच कार्यक्रम रद्द झाले अाहेत. पण त्यापूर्वीच महापौरांनी या पुलाचं उद्घाटन होणार नाही हे जाहीर करून टाकलं होतं. त्यामुळे आम्ही आमच्या सर्व शिवसैनिकांना पुलाचं उद्धघाटन रद्द झाल्याचं सांगून लोकांसाठी तो खुलं करतानाही कुणीही तिथं फिरकू नये, अशा सूचना दिल्या होत्या, असं नगरसेविका, स्थापत्य (उपनगरे) समिती अध्यक्षा अाणि शिवसेना विभाग संघटक साधना माने यांनी सांगितलं. 



 आम्ही आमच्या शाखांमधून अटलजींना श्रध्दांजली वाहिली. परंतु भाजपाच्या नगरसेवकांना या पुलाचं श्रेय लाटण्याची फारच घाई झाल्याचं दिसून येतं. आज आपण देशातील एक महत्वाचा नेता गमावला याची आम्हाला खंत आहे. पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की भाजपाच्या महत्वाच्या नेत्याचं निधन झालं, त्याच पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्ते यांना त्याचं काहीही वाटत नाही. एकीकडे देश दु:खात असताना भाजपाच्या  नेत्यांनी या पुलाचं काम आम्हीच केलं असं भासवण्यासाठी फोटोसेशन केलं. ही बाब निषेधार्ह असून आपण अशा पदाधिकाऱ्यांचा धिक्कार करत अाहोत.
- साधना माने, नगरसेविका



आम्ही काही नगरसेवकांसह तिथं गेलो होतो. पण उद्घाटन किंवा भाषणाबाजी आम्ही केली नाही. वाहतूक पोलिसांनीच बॅरिकेट्स काढून पूल लोकांसाठी खुला करून दिला. आम्ही केवळ नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि गोरेगावकरांसाठी हा पूल खुला झाला हे सांगण्यासाठीच गेलो होतो.
 - संदीप पटेल, भाजपा नगरसेवक,  पी-दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष



हेही वाचा -

मुंबईतील झाडं बाहेरून मजबूत पण अातून पोखरलेली

ओव्हर टाइम नाकारल्याने प. रेल्वेच्या १०० फेऱ्या रद्द



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा