एव्हरार्ड नगर : सायन-पनेवल मार्गावरील एव्हरार्ड नगरच्या बस थांब्याजवळ काही भुमाफियांकडून समाज मंदिरच्या नावाखाली पालिकेची जागा हडपण्याचा डाव सुरु आहे असा आरोप स्थानिकांनी केला आहे. यासाठी सध्या बांधकाम देखील सुरु असून या बांधकामाला पालिकेनेच परवानगी दिल्याचा फलक देखील याठिकाणी लावण्यात आला आहे. मात्र या जागेसाठी पालिकेने परवानगी दिली नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला आहे.
सदर जागा ही सर्विस रोडसाठी राखीव आहे. मात्र अनेक वर्षांपासून याठिकाणी रस्ताच न बनल्याने या मफियांनी ही जागा हडपण्यावा डाव आखला आहे. याबाबत येथील स्थानिक रहिवाशांनी पालिकेला पत्र लिहून हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची विनंती केली आहे. याबाबत पालिकेच्या एल विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबिये यांना विचारले असता त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.