Advertisement

आरेच्या तबेलावाल्यांची 42 कुटुंबं वाऱ्यावर ?


आरेच्या तबेलावाल्यांची 42 कुटुंबं वाऱ्यावर ?
SHARES

मुंबई - मेट्रो-3 प्रकल्पातील पुनर्वसन आणि विस्थापन योजनेतील मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) च्या अनागोंदी कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे.

गिरगावकरांच्या पुनर्वसनाचा मुद्दा अद्याप योग्य प्रकारे हाताळला नसताना आता आरेतील 42 कुटुंबांनाही मेट्रोमुळे रस्त्यावर येण्याची वेळ येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरेतील युनिट 19 येथील तबेला मालक आणि कामगारांची 42 घरे मेट्रो-3 मध्ये विस्थापित होणार असून या विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी एमएमआरसी आणि आरे डेअरी डेव्हलपमेंटकडून कोणताही आराखडा वा योजना तयार करण्यात आली नसल्याची माहिती येथील तबेला मालकांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. त्यामुळे ही सर्व कुटुंब हवालदील झाली आहेत.

1952 मध्ये दक्षिण मुंबईतील तबेले आणि तबेला मालकांना आरेत पुनर्वसित करण्यात आले. तेव्हापासून 32 युनिटमध्ये आपला पारंपारिक व्यवसाय सांभाळत शेकडो तबेले मालक आणि कामगारांची कुटुंबे राहत आहेत. पण, आता 32 युनिटपैकी 19 युनिटमधील 42 कुटुंबांवर मेट्रोची कुऱ्हाड कोसळणार आहे. आरे कारशेडच्या कामासाठी युनिट 19 मधील 42 घरे विस्थापित करण्यात येणार आहेत. या तबेले मालक आणि कामगारांच्या पुनर्वसनासाठी आरे डेअरी डेव्हलपमेंट आणि एमएमआरसीमध्ये बऱ्याचशा बैठका झाल्या असून एमएमआरसीने पुनर्वसनाची जबाबदारी उचललीय खरी, पण त्यादृष्टीने कोणतेही पाऊल अद्याप टाकलेले नाही. त्यातच या रहिवाशांना दूर कुठेतरी पुनर्वसित करण्यात येणार असल्यााचीही चर्चा आहे.

आमचा तबेला आणि आमचे घर याच ठिकाणी असून रात्री दीड वाजल्यापासून आमच्या कामाला सुरूवात होते. असे असताना आम्हाला जर दुर कुठे पुनर्वसित करण्यात आले तर आम्ही काम कसे करायचे, आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, असे म्हणत तिथल्या तिथे पुनर्वसन करण्याची मागणी तबेला मालक एल. जे. सिंग यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना केली आहे. पुनर्वसनाची योजना तयार नसताना एमएमआरसी काम सुरू करत असल्याने आम्हाला येथून हुसकावून लावण्याचा एमएमआरसीचा डाव असून हा डाव आम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होणार नाही असा इशाराही सिंग यांनी दिला आहे.

दरम्यान, आरे डेअरी डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाथू राठोड यांनी ही कुटुंब विस्थापित होणार असून त्यांच्या पुनर्वसनाची सर्वस्वी जबाबदारी एमएमआरसीची आहे. ही जबाबदारी एमएमआरसीने स्वीकारली असल्याचे 'मुंबई लाईव्ह'ला सांगितले. त्यानुसार एमएमआरसीशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर एमएमआरसीच्या पुनर्वसन-विस्थापन विभागाच्या प्रमुख माया पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगते असे म्हणत याविषयी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा