SHARE

मुंबईसह राज्यभरात मागील वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात प्रचंड थंडी पडली होती. पहाटे व रात्री अनेक जण स्वेटर, मफलर गुंडाळून घराबाहेर पडत होतो. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबर संपून डिसेंबर सुरू झाला तरी अद्याप मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, यंदा हिवाळा हा फारसा तीव्र नसणार आहे. 'सरासरी किमान तापमानाच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये तापमान अधिक राहील’, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

किमान तापमान

मुंबईत सर्वसाधारणपणे नोव्हेंबरमध्ये किमान तापमान २० अंशांच्या खाली जाते. मात्र यंदा नोव्हेंबर महिना संपला, तरी किमान तापमान २० अंशांच्या खाली गेलेले नाही. त्यामुळे यंदाचा हिवाळा तीव्र नसणार आहे, याची चुणूक मुंबईकरांना मिळाली आहे. शुक्रवारी कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

पूर्वानुमानानुसार मुंबईकरांना डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत फारशी थंडी अनुभवायला मिळणार नाही. किमान तापमान हे १८ ते २० अंशांदरम्यान असण्याची शक्यता आहे. हे तापमान डिसेंबरच्या किमान सरासरीपेक्षा जास्त असेल. पहाटेच्या वेळी गारठा जाणवेल पण अपेक्षित थंडीसाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागेल. मुंबईमध्ये पुढील दोन आठवडे तरी कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत कायम राहील, अशी शक्यताही हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.

तापमानात वाढ

मध्य महाराष्ट्रामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात तापमापकाचा पारा १२ ते १३ अंशांदरम्यान असेल, अशीही शक्यता आहे. शुक्रवारी राज्यभरात किमान तापमानात सरासरीपेक्षा मोठी वाढ झाल्याचं आढळून आलं आहे.हेही वाचा -

आरे आंदोलन : २९ आंदोलकांवरील गुन्हे मागे

कोण होणार उपमुख्यमंत्री?संबंधित विषय
ताज्या बातम्या