Advertisement

कोण होणार उपमुख्यमंत्री?

प्रामुख्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हाती ही जबाबदारी सोपवण्यात येईल की इतर दुसऱ्या कुठल्या नेत्याकडे, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कोण होणार उपमुख्यमंत्री?
SHARES

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेचाच उपमुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे. परंतु महाविकास आघाडीमधील दुसऱ्या क्रमांकाचं हे पद कुठल्या नेत्याला मिळणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. प्रामुख्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हाती ही जबाबदारी सोपवण्यात येईल की इतर दुसऱ्या कुठल्या नेत्याकडे, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला बनत असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाला प्रत्येकी ४ आमदारांमध्ये १ मंत्रीपद मिळेल असं सूत्र ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार शिवसेनेला १६ मंत्रीपदं, राष्ट्रवादीला १४ मंत्रीपदं आणि काँग्रेसला १२ मंत्रीपदं नक्की करण्यात आली. त्यानंतर खल सुरू झाला तो मुख्यमंत्री किती वर्षे कुणाकडं राहणार? उपमुख्यमंत्रीपद किती वर्षे कुणाच्या वाट्याला येणार? आणि विधानसभा अध्यक्षपदाची काठी कुणाच्या हाती राहणार यावरून. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील बैठकांची फेरी एक एक टप्पे गाठत असताना या चर्चेतीत बातम्याही उडत उडत प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. त्यात खरं की खोटं की हे कळत नसलं तरी, सुरूवातीच्या टप्प्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्री असेल आणि काँग्रेसकडे ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद तसंच विधानसभेचं अध्यक्षपद असेल, असं म्हटलं जात होतं. त्यानंतर बातम्या आल्या की ५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री तर अडीच-अडीच वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल. त्याचप्रमाणे विधानसभेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल. 

हेही वाचा- अजित पवार अजूनही नाराज? अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर ठाम

या सूत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नाराज असल्याचंही म्हटलं जात होतं. राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळत असेल, तर त्यांनी हे पद सोडू नये असं त्यांचं म्हणणं होतं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठणकावून सांगितल्यानेचं अजित पवार नाराज होऊन भाजपच्या गोटात गेले आणि रातोरात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचं म्हटलं जाऊ लागलं. परंतु नंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी समजूत घातल्यावर उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षातील स्थान अबाधित राखण्याच्या अटीवर अजित पवार पक्षात परतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.  

मात्र अजित पवार बंड करून पक्षात परतले असले, तरी शरद पवारांना त्यांचं हे वागणं पटलेलं नाही. कुटुंबातील सदस्य असले, तरी तापट माथ्याच्या आणि बेभरवशाच्या अजित पवार यांच्या हाती ते उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात तयार नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि स्वभावाने नेमस्त असलेल्या व्यक्तीच्या हातात सोपवण्याविषयी शरद पवार विचार करत आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या दोन राष्ट्रवादीच्या २ नेत्यांमध्ये अजित पवार यांच्याऐवजी जयंत पाटील यांचंच नाव आल्याने अजित पवार यांच्या मनात घालमेल सुरू झाली.

हेही वाचा- या कारणांमुळे अजित पवारांनी भाजपला साथ दिली

त्यामुळे प्रसारमाध्यमांशी बोलताना वारंवार मी बंड केलं नाही, मी नाराज नाही, असं ते कितीही बोलत असले, तरी शरद पवारांचं मन वळवण्यासाठी ते सातत्याने सिल्व्हर ओकच्या वाऱ्या करू लागले. त्यांचे हे प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत. 

तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या मनातही उपमुख्यमंत्रीपदाची लालसा निर्माण झाल्याने ते या पदावर दावा सांगू लागले आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांमार्फत दबाव टाकू लागले. परंतु राष्ट्रवादीने हे पद आपल्याच हाती ठेवत काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदावर समाधान ठेवण्यास भाग पाडलं आहे.

फक्त आता प्रश्न एवढाच शिल्लक आहे की राष्ट्रवादीच्या वाट्याचं उपमुख्यमंत्रीपद कुठल्या नेत्याला मिळणार? नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार २५ डिसेंबरआधी होण्याची शक्यता वाटत नाही. कारण उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे व नागपूर इथं होणारं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच २२ डिसेंबरनंतर या पदाबाबद पक्ष निर्णय घेणार आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. तोपर्यंत हा सस्पेन्स कायम राहणार आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा