Advertisement

मंत्रालयातील आत्महत्येच्या प्रयत्नांचा सिलसिला थांबेना

नुकताच लक्ष्मण चव्हाण नावाच्या एका व्यक्तिनं सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच आता वृद्ध महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे.

मंत्रालयातील आत्महत्येच्या प्रयत्नांचा सिलसिला थांबेना
SHARES

मंत्रालयात आणि मंत्रालयाबाहेर आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रकार काही थांबता थांबताना दिसत नाहीत. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका वृद्ध महिलेनं अंगावर राॅकेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पण मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनी त्वरीत धाव घेत या महिलेला वाचवण्यात यश मिळवलं आहे. नुकताच लक्ष्मण चव्हाण नावाच्या एका व्यक्तिनं सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच आता वृद्ध महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे.


पोलिस चौकशी करत नसल्यानं आत्महत्या

आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला चेंबूरमध्ये राहत असून या महिलेचं नाव अद्याप समजलेलं नाही. या महिलेने मुलीच्या लग्नासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. त्यानंतर या महिलेनं सर्व कर्जाची परतफेड केली होती. मात्र हा खाजगी सावकारानं कर्जाच्या पैसाची परतफेड करण्यासाठी तगादा लावल्यानं या महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलीस चौकशी करत नसल्यानं या महिलेनं मंत्रालयाच्या गेटसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.


सुरक्षारक्षकांनी वाचवला जीव

त्यादरम्यान मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे एसआरपीएफचे जवान डी. के. माने आणि पोलीस शिपाई के. डी. राऊत यांनी तातडीनं या महिलेच्या हातातील रॉकेलची बाटली काढून घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. सध्या या महिलेची पोलिस चौकशी सुरू असून मंत्रालय परिसरातही गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे.


मंत्रालय नव्हे आत्महत्यालय

गेल्या वर्षभरात मंत्रालय आणि मंत्रालयाबाहेर आत्महत्या आणि आत्महत्येच्या प्रयत्नांचे प्रकार वाढले असून हा सिलसिला काही संपत नसल्याचं चित्र आहे. धर्मा पाटील या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली होती. तर हर्षल रावते नावाच्या एका कैद्याने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती. रावतेच्या आत्महत्येनंतर मंत्रालय प्रशासन जागं झालं आणि मंत्रालयात संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या. तर मंत्रालयातील सुरक्षा वाढवण्यात आली. पण त्यानंतरही आत्महत्येच्या प्रयत्नांचा सिलसिला कायम आहे. गुलाब शिनगारे, बबन झोटे, दिलीप सोनावणे, राधाबाई साळुंखे, लक्ष्मण चव्हाण यांसह अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. हे प्रकार रोखण्यास प्रशासनाला यश येत नसल्यानं व सातत्यानं आत्महत्येचे प्रकार सुरू असल्यानं मंत्रालय आत्महत्यालय बनू पाहतयं का? असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे.



हेही वाचा -

हुश्श! अखेर धारावी पुनर्विकासासाठी दोन निविदा सादर

शशांक रावांचा मोर्चा आता पालिकेकडे, पालिका कर्मचारी जाणार संपावर?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा