बदलीसाठी आमदाराचे शिफारस पत्र देताय? जरा जपून...


बदलीसाठी आमदाराचे शिफारस पत्र देताय? जरा जपून...
SHARES

तुम्ही बदलीसाठी आमदारांचे शिफारस पत्र देताय? तर जरा जपून! असं म्हणण्याची वेळ सध्या मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आली आहे. याचं कारण आहे शिफारशींसाठी आमदारांचं पत्र दिल्याने चक्क एका मंत्रालयातील कर्मचाऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

अविनाश सावंत( नाव बदलेले आहे) हे मंत्रालयातील गृह निर्माण विभागात काम करतात. त्यांना गृह किंवा महसूल विभागामध्ये बदली पाहिजे होती. बदली मागून मिळत नव्हती म्हणून त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराकडून शिफारस पत्रही पाठवले होते. शिफारस पत्र पाठवल्याने आपली बदली होणार याचा अविनाश सांवत यांना विश्वास होता.

मात्र अविनाश सावंत यांची बदली तर झाली नाहीच पण उलट त्यांच्याकडून आमदाराच्या शिफारस पत्राबाबत खुलासा मागवण्यात आला. विशेष म्हणजे अविनाश सावंत यांच्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी आमदारांचे शिफारस पत्र पाठविले होते अशा कर्मचाऱ्यांकडून आता खुलासा मागितला जात आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप होणारं मंत्रालय आता सुधारताना दिसत आहे.

विशेष म्हणजे आमदारांचे शिफारस पत्र दिल्यानंतर अविनाश सावंत यांच्या नावाने मेमो काढण्यात आला आणि शिफारस पत्राबद्दल कारण लिखित स्वरुपात द्यावे असा आदेश देण्यात आला. अविनाश सावंत यांनी सामान्य प्रशासन विभागाला पत्र देऊन खुलासा केलाय की, आमदारांना वाटले की माझ्या बदलीसाठी शिफारस करावी, म्हणून बदलीसाठी त्यांनी शिफारस केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयामधील बदल्या सामान्य प्रशासन विभागाकडून केल्या जातात. मात्र सध्या सामान्य प्रशासन विभागामध्ये आमदारांच्या शिफारस पत्रांना जास्त महत्व दिले जात नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मर्जीनुसार बदल्या मिळत नसल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड होत आहे.

संबंधित विषय