Advertisement

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात कार्यशाळा


आपत्कालीन व्यवस्थापनासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात कार्यशाळा
SHARES

एखादी आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास सर्वात मोठा ताण पडतो तो रुग्णालय आणि तिथल्या कर्मचाऱ्यांवर. पण, आता या सर्व परस्थितीत रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांनाही सहभागी करुन घेण्याचा विचार सेंट जॉर्ज रुग्णालयाने केला आहे. त्यासाठी रुग्णालयात लवकरच डॉक्टर, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कामगार वर्ग आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी खास रुग्णालय सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनासाठी कार्यशाळा घेतली जाणार आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून डॉक्टर आणि पारिचारिकांनाच नव्हे तर, त्यांच्या कुटुंबियांनाही आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करावा? याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे.

एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली की रुग्णालयातील प्रत्येक विभागानं नेमकं काय करावं? याचं प्रशिक्षण या कार्यशाळेत दिलं जाणार आहे. त्यामुळे दिलेली जबाबदारी कशा पद्धतीनं पार पाडावी याचं नियोजन होईल आणि होणारी धावपळही थांबेल, असं मत सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाशीही संपर्क साधल्याचं डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केलं.


एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, की सर्वात जास्त रुग्णालयात गर्दी होते ती बघ्यांची. त्यामुळे अनेकदा त्याचा त्रास डॉक्टरांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही होतो. त्यामुळे आम्ही डॉक्टरांसोबत रुग्णांच्या नातेवाईकांनाही आपत्कालीन परिस्थितीत काय करावं? आणि काय करू नये? याबद्दलचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाशीही चर्चा झाली आहे.

डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय


संबंधित विषय