इमान गुरुवारी अबुधाबीला जाणार

 Charni Road
इमान गुरुवारी अबुधाबीला जाणार

जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद गुरुवारी अबुधाबीला जाणार आहे. अबुधाबी येथील बुर्जिल रुग्णालयात तिच्यावर पुढील उपचार होणार आहेत. त्यासाठी तिला अबुधाबीला घेऊन जाणार आहेत.  मंगळवारी मध्यरात्री इमानला अबुधाबीसाठी हलवण्यात येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण याविषयी डॉक्टर लकडावाला यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशी कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले होते. पण, आता ती गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास अबुधाबीला निघणार आहे. तिच्या कुटुंबियांना बुधवारी बोलावण्यात येणार आहे.  इमान जेव्हा अबुधाबीला जाईल तेव्हा तिच्यासोबत डिस्चार्ज कार्डसह विस्तृत आणि सखोल वैद्यकीय अहवाल पाठवण्यात येणार आहे. यात इमानच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासह या आजाराविषयीही सूक्ष्म माहिती देण्यात येणार आहे. तिला देण्यात आलेल्या उपचारपद्धतीची माहिती बुरजील येथील डॉक्टरांच्या टीमला अधिकाधिक उपयोगी ठरावी, या हेतूने हा अहवाल पाठवला जाणार आहे.

वाहतूक समस्येमुळे तिला अबुधाबीला नेण्यास विलंब होत असल्याचं सैफी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं होतं. इमानला 30 किंवा 1 मेला अबुधाबीला नेण्यात येणार होतं. मुंबई ते अबुधाबीतील बुरजील रुग्णालय हा जवळपास सहा तासांचा प्रवास आहे. याबाबतीत बुरजील मधील रुग्णालयानेही प्रवासात कोणताही त्रास होणार नाही अशी हमी दिलीय. इमानची बहीण शायमा हिच्या अनेक आरोपांनंतर सैफी रुग्णालयाच्या प्रशासनाने इमानला अबुधाबीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अबुधाबीतील बुरजील रुग्णालयाने इमानवर मोफत उपचार करण्याचा प्रस्ताव दिला. तसंच आता ती एकदम फिट आहे. त्यामुळे ती आता मुंबई ते बुरजील प्रवास करु शकते. 

500 किलो वजनाच्या इमानवर 7 मार्च 2017 ला बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सध्या तिचं वजन 176 किलोग्रॅम आहे. त्यानंतर इमानच्या बहिणीने सैफी रुग्णालय आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर अनेक आरोप करून नव्या वादाला तोंड फोडले. पण, तरीही व्हिपीएसने इमानला चालायला हातभार लावला तर तो एक आनंदी क्षण असल्याचं सैफी रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. गेली 25 वर्ष इमान आपल्या पायांवर उभी राहिलेली नाही. पण, आता ती उठून बसू लागली आहे. अजूनही तिचे चालणे अवघड आहे, असेही सैफी रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

इमानच्या बहिणीविरोधात डॉक्टरांची लेखी तक्रार

इमानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा राजीनामा

डॉक्टर खोटं बोलल्याचा इमानच्या बहिणीचा आरोप

Loading Comments