झिका पसरतोय, काळजी घ्या...

झिका पसरतोय, काळजी घ्या...
झिका पसरतोय, काळजी घ्या...
झिका पसरतोय, काळजी घ्या...
See all
मुंबई  -  

अहमदाबादच्या बापूनगरमध्ये झिका व्हायरसचे तीन रुग्ण आढळल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने मुंबईतील रुग्णालयांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांचं निरीक्षण करण्याची मागणी सरकारकडे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आली आहे. याविषयी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनीही नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे.

झिका आजाराचा विषाणू राज्यात आढळून आला असला तरी त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह झिका आजाराचा धोका टाळता येऊ शकतो, आरोग्य विभागाने त्यासाठी आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली.

''राष्ट्रीय रोगनिदान संस्था, नवी दिल्ली आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे झिका आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. संशयित रुग्णांनी तात्काळ या ठिकाणच्या रोगनिदान केंद्राशी संपर्क साधून या रोगावर उपचार घ्यावेत. झिका आजारावर अद्यापपर्यंत कुठलीही लस अथवा विशिष्ट औषधोपचार प्रणाली विकसित नसल्याने प्रतिबंध हाच त्यावर सर्वोत्तम उपाय ठरतो. त्यामुळे संशयित रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. रुग्णांनी पुरेशा प्रमाणात विश्रांती घ्यावी. तसेच निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे. तापाकरिता पैरासिटामोल हेच औषध वापरावे. एस्पिरिन अथवा एन. एस. ए. आय. डी प्रकारातील औषधांचा वापर करू नये. झिका आजाराचा प्रसार एडीस या डासापासून होत असल्याने नागरिकांनी घर, सोसायटी परिसरात डास निर्मूलनाची मोहीम हाती घ्यावी. डास होणार नाहीत यासाठी पुरेशी दक्षता घ्यावी. झिका हा आजार कीटकजन्य आहे. त्याचा प्रसार हवेमार्फत होत नाही.”

डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री

‘आतापर्यंत झिका या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंदणी होत नव्हती. पण, आता डब्ल्यूएचओनेही भारतात तीन रुग्ण आढळून आले असल्याचं निश्चित केली आहे. आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे. तसंच बाहेरच्या देशात प्रवास करणाऱ्या लोकांचीही संख्या जास्त आहे. तसंच वातावरणात होणारे बदल, गरमी वाढलीय जेणेकरुन आपण सर्वांनीच स्वत:ची आणि परिसराची स्वच्छता ठेवली पाहिजे. ’

डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, महाराष्ट्र (इंडियन मेडिकल असोसिएशन)

ब्राझील , दक्षिण अमेरिका अशा देशात खळबळ माजवल्यानंतर आता भारतातही झिका व्हायरस ने प्रवेश केला आहे. झिका व्हायरसचे 3 रुग्ण अहमदाबादच्या बापूनगर येथे आढळले आहेत. डब्लूएचओने या तीन केसेस भारतात आढळल्या असल्याचं निश्चित केलं आहे. चिकनगुनिया आणि डेंग्यू अशा आजारांचाही प्रादुर्भाव याच डासांतून होतो आणि झिका व्हायरस हा विषाणूही डासांतून पसरतो. पहिली केस फेब्रुवारी 2016, दुसरी केस नोव्हेंबर 2016, तर तिसरी केस जानेवारी 2017 मध्ये आढळली आहे. या तिन्ही केसेसच्या चाचण्या पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवून त्याचे रिपोर्टसही पॉझिटीव्ह आले आहेत. एडिस एजिप्ती या डासामुळे झिका विषाणू पसरतो.

बाहेरच्या देशात प्रवास करणाऱ्यांना या विषाणूची बाधा जास्त प्रमाणात होत असल्याचे आढळून आले आहे. याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये, म्हणून नागरिकांना या आजाराविषयी सतर्कता बाळगण्याचा इशाराही देण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये तीन रुग्ण आढळल्यानंतर याची गंभीर दखल सार्वजनिक आरोग्य विभागाने घ्यायला सुरुवात केलीय. तीन रुग्णांपैकी 1 रुग्ण ही गर्भवती महिला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सर्व रुग्णालयांना विशेषत:स्त्री रुग्णालयांना याकडे लक्ष देण्याच्या सुचना केल्या आहेत.झिका व्हायरसची लक्षणे

ताप, सांधेदुखी, शरीरावर लाल चट्टे उठणे, डोळे लाल होणे, खाजणे, उलट्या,थकवा अशी प्राथमिक लक्षणे आहेत.
एडिस जातीच्या डासाच्या दंशामुळे झिका विषाणू शरीरात प्रवेश करतो.
या डासांमुळे डेंग्यू किंवा चिकूनगुनियाही होऊ शकतो.
हा डास चावल्यावर 2 ते 7 दिवसांत लक्षणे दिसायला सुरुवात होते.
झिका व्हायरसची लागण झाल्यास रुग्णाला आधी लकवा मारतो. शरीरात या आजाराचे प्रमाण वाढले तर पायांची ताकद हळहळू कमी होते. झिका विषाणू असलेला डास जर गभर्वती महिलेला चावला तर जन्माला येणाऱ्या बाळाचा मेंदू विकसित होण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच या रोगाची लक्षणे लवकर स्पष्ट दिसत नाहीत आणि याच्यावर कोणतीही ठरावीक औषधे आणि लस उपलब्ध नाहीत. त्यामुळे लक्षणे आढळल्यास लगेचच रक्त तपासणी करावी. प्रादुर्भाव झालेल्या चारपैकी एकाच व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून येतात. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उपाय काय कराल -

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण तसेच यकृताचे विकार, ह्रदयविकार, मधुमेह, गर्भवती महिला, नवजात बालक यांना या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. हा विषाणू डासांमुळे पसरत असल्याने डासांची पैदास होणं थांबवणे, परिसर स्वच्छ ठेवावा, डबक्यांमध्ये, घरात, आजूबाजूला पाणी साचून राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. शरीरात ताप, डोकेदुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. डेंग्यू, मलेरिया या आजारांपासून वाचण्यासाठी जे उपाय करतो, तेच उपाय झिका विषाणूंना रोखण्यासाठी करावेत, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. घरात फार दिवस भरलेले पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. या रोगावर उपचार करणारी कोणतीही लस अथवा औषध सध्या नाही. पण, लक्षणे आढळलेल्या रुग्णांना अधिक पाणी पिण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

डब्लूएचओने भारतातील अहमदाबादच्या बापूनगर या परिसरातून 3 केसेस निश्चित केल्या आहेत. झिका, डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांवर आजही लसीकरण उपलब्ध नाही. पण, जर भारतात झिका विषाणू पसरत असेल तर आपण सगळ्यांनी नक्कीच काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्या देशातून फिरुन आलेल्या लोकांनी आपल्या रक्ताची तपासणी करुन घ्यावी.

राजू परुळेकर, इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.