Advertisement

१५ वर्षीय आर्यनची क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी


१५ वर्षीय आर्यनची क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी
SHARES

मुंबईत शालेय क्रिकेटमध्ये अनेक नवनव्या विक्रमांची नोंद होत असते. दोन वर्षांपूर्वी प्रणव धनावडेने एकाच सामन्यात एक हजारपेक्षा जास्त धावा करण्याचा विश्वविक्रम रचला होता. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी २५ वर्षांपूर्वी हॅरिस शिल्ड या शालेय क्रिकेट स्पर्धेत ६६४ धावांच्या अभेद्य भागीदारीचा विक्रम साकारला होता. आता ठाण्यातील सर्वात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या एन. टी. केळकर क्रिकेट स्पर्धेत एका १५ वर्षाच्या मुलाने चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. एन. टी. केळकर करंडक स्पर्धेत सरस्वती एज्युकेशन शाळेच्या आर्यन बापट याने तीन षटकांत एकही धाव न देता प्रतिस्पर्धी लिटिल फ्लॉवर हायस्कूलच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवले.


सरस्वती हायस्कूलचा विजय

आयुष्यातील पहिल्याच स्पर्धेत खेळणाऱ्या आर्यनने प्रतिस्पर्ध्यांचा निम्मा संघ तंबूत पाठवत आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. आर्यनने (३ षटके, ० धावा, ५ विकेट्स) अशी कामगिरी साकारली आहे. सरस्वती एज्युकेशन स्कूल आणि लिटिल फ्लॉवर हायस्कूल यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात सरस्वती शाळेने लिटिल फ्लॉवर हायस्कूलसमोर विजयासाठी ११८ धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. पण आर्यन बापटने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लिटिल फ्लॉवर हायस्कूलचे कंबरडे मोडले, त्यामुळे सरस्वती हायस्कूलचा विजय सुकर झाला.


ऑलराऊंडर आर्यन

आर्यन सध्या सरस्वती शाळेत १०वीत शिकत असून त्याने ६-७ महिन्यांपूर्वीच माजी रणजीपटू सुलक्षण कुलकर्णी यांच्या क्रिकेट अकादमीत प्रशिक्षणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आहे. कमी कालावधीच गोलंदाजीचे तंत्र आत्मसात करत आर्यनने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. आर्यन हा गोलंदाजीसोबत सलामीवीर फलंदाज म्हणूनही ओळखला जातो.


“आर्यनने केलेली कामगिरी खूपच चांगली आहे. आयुष्यातील त्याची ही सुरुवात असल्यामुळे भविष्यात तो एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून सर्वांसमोर येईल. ६-७ महिन्यांच्या कालावधीतच अशी कामगिरी म्हणजे त्याच्यासाठी संस्मरणीय म्हणावी लागेल,’’ असे आर्यनचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा