दुहेरी हितसंबंध प्रकरणात सचिनला क्लीन चीट

सचिनसह सौरव आणि लक्ष्मणला बीसीसीआयच्या लोकपालने नोटीस पाठवत चौकशी समितीसमोर हजर राहून खुलासा मागितला होता.

दुहेरी हितसंबंध प्रकरणात सचिनला क्लीन चीट
SHARES

बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांच्याकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला दुहेरी हितसंबंधाच्या प्रकरणात क्लीन चीट देण्यात आली. आयपीएल २०१९ दरम्यान दुहेरी हितसंबंधाच्या मुद्द्यावरून सचिन, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्याकडून बीसीसीआयच्या लोकपालने खुलासा मागितला होता.

लोकपालांकडे तक्रार

सचिन तेंडुलकर बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी)चा सदस्य आहे. या समितीकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीचे अधिकार देण्यात आले आहेत. असं असतानाही आयपीएलमध्ये सचिनने मुंबई इंडियन्स संघाचा आयकाॅन म्हणून काम केल्याने सचिनविरोधात बीसीसीआयच्या लोकपालांकडे तक्रार करण्यात आली होती.

नियम काय सांगतो?

बीसीसीआयच्या नियमानुसार, बीसीसीआय संघटनेमध्ये पद भूषवत असलेला कुठलाही अधिकारी आयपीएलमध्ये काम करु शकत नाही. त्यामुळे सचिनसह सौरव आणि लक्ष्मणला बीसीसीआयच्या लोकपालने नोटीस पाठवत चौकशी समितीसमोर हजर राहून खुलासा मागितला होता. आयपीएलदरम्यान सौरव दिल्ली कॅपिटल्सचा, तर लक्ष्मण हैद्राबाद सनरायझर्सचा सल्लागार होता.

सचिनचा खुलासा

त्यावर सचिनने बीसीसीआयच्या चौकशी समितीसमोर हजर राहून खुलासा केला की, तो मुंबई इडियन्सचा आयकाॅन असला, तरी त्यासाठी तो कुठलंही मानधन घेत नाहीय. शिवाय आधीपासूनच मुंबई इंडियन्स संघाशी जोडलेला असतानाही बीसीसीआयने त्याची क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य म्हणून निवड केलेली आहे.  

एवढंच नाही, तर जोपर्यंत यासंबंधी बीसीसीआय योग्य दिशा निर्देश ठरवत नाही, तोपर्यंत आपण सल्लागार समितीचा सदस्य म्हणून काम बघणार नाही, असं म्हणत सचिनने या पदाचा राजीनामा दिला. 

तोपर्यंत बाजूला

सचिनला क्लीन चीट दिल्यावर पुन्हा ‘सीएसी’चा सदस्य होता येईल का? असा प्रश्न लोकपाल यांना विचारल्यावर त्यांनी बीसीसीआयने दुहेरी हितसंबंधाबाबत योग्य दिशानिर्देश बनवल्यानंतरच सचिनच्या सदस्यत्वाबाबत निर्णय घेता येईल. यादरम्यान नवीन प्रशिक्षण निवडीची वेळ आल्यास सचिन या प्रक्रियेत सहभागी नसेल. असं त्यांनी स्पष्ट केलं.  हेही वाचा-

सचिन-लक्ष्मण १४ मे रोजी BCCI च्या लवादासमोर होणार हजरसंबंधित विषय