Advertisement

शेन वॉटसनने लावली वाट, चेन्नई सुपर किंग्स ठरला आयपीएलचा चॅम्पियन!


शेन वॉटसनने लावली वाट, चेन्नई सुपर किंग्स ठरला आयपीएलचा चॅम्पियन!
SHARES

दुसऱ्या जेतेपदानंतर सात वर्षांचा कालावधी… स्पॉट-फिक्सिंगच्या कारणावरून गेली दोन वर्षे आयपीएलमधून बाहेर पडण्याची नामुष्की… याची कसर भरून काढत सातव्यांदा गाठलेली आयपीएलची अंतिम फेरी… शेन वॉटसनचा वानखेडे स्टेडियमवर धमाका… यंदाच्या आयपीएलमध्ये वॉटसननं फटकावलेलं दुसरं शतक… या कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सनं ८ विकेट्स आणि ९ चेंडू राखून आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. २००९ आणि २०१० मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईचं हे तिसरं विजेतेपद ठरलं.

केन विल्यम्सन आणि युसूफ पठाण यांच्या सुरेख फलंदाजीमुळे सनरायझर्सने २० षटकांत ६ बाद १७८ धावा फटकावत चेन्नईसमोर विजयासाठी आव्हानात्मक धावसंख्या ठेवली होती. सुरुवातीला चेन्नईने पहिला धक्का पचवला. मात्र शेन वॉटसनच्या तडाख्यापुढे सनरायझर्स हैदराबादचे मातब्बर गोलंदाज निष्प्रभ ठरले. या आयपीएलमधील दुसरं शतक फटकावणाऱ्या वॉटसननं नाबाद ११७ धावांची खेळी साकारत चेन्नईला विजेतेपद मिळवून दिलं. सनरायझर्स हैदराबादचं मात्र दुसरं विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न अधुरं ठरलं.


सनरायझर्सची संथ सुरुवात

चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या आयपीएल-११च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. मात्र श्रीवत्स गोस्वामी आणि शिखर धवन या सनरायझर्सच्या सलामीवीरांना सूर गवसत नव्हता. दुसऱ्या षटकांत श्रीवत्स गोस्वामीच्या रूपाने सनरायझर्सला पहिला धक्का बसला. मात्र त्यानंतर पहिल्या पाच षटकांत सनरायझर्सनं संथ सुरुवात केली होती.

केन विल्यम्सनने तारले

संथ सुरुवातीनंतर केन विल्यम्सनने सनरायझर्सच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. त्याने शिखर धवनसह ५१ धावांची आणि शाकिब अल हसनच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे सनरायझर्सला सामन्यात कमबॅक करता आलं. मात्र केन विल्यम्सनची खेळी कर्ण शर्मा यानं ४७ धावांवर संपुष्टात आणली.


युसूफचा ‘पठाणी’ हिसका

सनरायझर्सला मोठ्या खेळीची अपेक्षा असताना युसूफ पठाणने ‘पठाणी’ हिसका दाखवत संघाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. त्यानं अखेरच्या षटकांत तुफान हाणामारी केली. मात्र अखेरच्या दोन षटकांत सनरायझर्सला मोठी फटकेबाजी करता न आल्यानं त्यांना २० षटकांत ६ बाद १७८ धावाच करता आल्या. युसूफनं २५ चेंडूंत नाबाद ४५ धावा केल्या.

चेन्नईला पहिला धक्का

सनरायझर्सचे १७९ धावांचे ध्येय पार करताना चेन्नई सुपर किंग्सला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. फॅफ डू प्लेसिस या धोकादायक फलंदाजाला संदीप शर्माने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करत सनरायझर्सला पहिलं यश मिळवून दिलं. पहिला धक्का बसल्यानंतर चेन्नईनं सावध फलंदाजी केली.

वॉटसन धमाका

कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असलेला शेन वॉटसन यंदा चेन्नईसाठी खूपच फायदेशीर ठरला आहे. अंतिम सामन्यात त्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असताना त्यानंही आपल्या चाहत्यांची निराशा केली नाही. सनरायझर्सच्या अव्वल फलंदाजांचा पुरेपूर समाचार घेत वॉटसननं सुरेश रैनाच्या साथीने ११७ धावांची भागीदारी करत चेन्नईला तिसऱ्या विजेतेपदापर्यंत आणून ठेवलं.

वॉटसनचं दुसरं शतक

वॉटसननं अखेरपर्यंत किल्ला लढवत आयपीएलमधलं चौथं शतक साजरं केलं. त्याचं हे यंदाच्या आयपीएलमधील दुसरं शतक ठरलं. वॉटसननं सनरायझर्सच्या फलंदाजांची अक्षरश: वाट लावत ५७ चेंडूंत ११ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ११७ धावांची खेळी करत चेन्नईला तिसरं जेतेपद मिळवून दिलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा