सिक्सर किंग युवराजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि सिक्सर किंग युवराज सिंग यानं सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा राजीनामा दिला. निवृत्तीची घोषणा करताना युवराज भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

SHARE
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि सिक्सर किंग युवराज सिंग यानं सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा राजीनामा दिला. युवराजनं दक्षिण मुंबईतील एका हाॅटेलमध्ये बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केलीनिवृत्तीची घोषणा करताना युवराज भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

स्वप्न पूर्ण

'कधीही हार मानायची नाही, खाली पडलो तरी धूळ झटकत पुन्हा उभं राहायचं, ही वृत्ती मी क्रिकेटकडूनच शिकलो असं युवराज म्हणाला. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की, मी वर्ल्ड कप खेळावं आणि तो जिंकावा, हे स्वप्न मी पूर्ण केलं आणि आजही तो माझ्या सगळ्यात आठवणीतला क्षण असल्याचं युवराज म्हणाला. यशाच्या शिखरावर असताना कॅन्सरनं आपल्याला गाठलं आणि कारकिर्द संपुष्टात येतं की, काय असा प्रसंग आला. मात्र, डॉक्टरांची मेहनत आणि कुटुंबीयांचं व चाहत्यांचं प्रेम यांच्या जीवावर त्यावर मात केली. क्रिकेटच्या जीवनात कटू-गोड प्रसंग खूप आले, हे अनुभव खूप काही शिकवून गेल्याचं युवराज म्हणाला.

आयुष्यभर पुरणाऱ्या आठवणी

'नेटवेस्टमध्ये अंतिम सामन्यात मिळवलेला विजय, लाहोरमध्ये ठोकलेलं शतक, वर्ल्ड कपमध्ये केलेली कामगिरी या आयुष्यभर पुरणाऱ्या आठवणी आहेत. यशाच्या शिखरावरून उतरल्यावर मला खूप संघर्ष करावा लागला. संघाबाहेर फेकलो गेलो. तरीही मी हार न मानता भरपूर सराव केला. स्थानिक सामन्यांमध्ये जास्तीत जास्त धावा करन पुन्हा संघात येण्यासाठी झगडलो. स्वत: वर विश्वास असेल तर तुम्ही जे अशक्य आहे तेही साध्य करू शकता', असंही त्यानं म्हटलं.

निवृत्तीचा निर्णय कठीण

'सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, झहीर खान, आशिष नेहरा हे क्रिकेट विश्वातले आपले सोबती असल्याचं युवराज म्हणाला. सचिन माझा आदर्श आहे. निवृत्तीचा निर्णय माझ्यासाठी कठीण होता. माझ्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. या निवृत्तीनंतर मी स्थानिक टी-२० सामने खेळत राहणार आहे. या खेळातून मला जे काही मिळालंय ते आयुष्यभरासाठी माझ्यासोबत राहील, आज जे काही मिळालं त्याबद्दल मला अभिमान आहे', असंही युवराज म्हणाला.

जबरदस्त कामगिरी

२०११ च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात युवराज सिंगनं जबरदस्त कामगिरी केली होती. युवराज या सामन्यात २४ चेंडूत २ चौकार मारत २१ धावा करत नाबाद राहीला होता. तसंच, २००७ सालच्या टी २० वर्ल्डकपमध्ये देखील युवराजनं मोलाचं योगदान दिलं होतं. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात युवराजनं १६ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकार मारत ५८ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे या सामन्यात इंग्लंडचा जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या गोलंदाजीवर युवराजनं एका मागोमाग एक असे ६ षटकार मारले होते. यानंतर भारतातील वातावरण 'युवराजमय' झालं होतं. तसंच, त्याच्या या षटकारांची आजही क्रिकेट चाहत्यांना जाणीव होतं आहे.

फाॅर्म घसरला

मात्र, २०११ च्या वर्ल्ड कपनंतर युवराजचा वाढत्या वयानुसार फाॅर्म घसरला. त्यामुळं युवराज मागील काही काळापासून टीम इंडियाच्या बाहेरच होता. ३० जून २०१७ रोजी तो वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा वन डे सामना खेळला. आयपीएलमध्येही त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळं बहुतांश सामने त्याला बाकावर बसूनच बघावे लागले.

क्रिकेट कारकिर्द

युवीनं ४० कसोटी सामन्यांत ३३.९२ च्या सरासरीनं १९०० धावा केल्या आणि ९ विकेट्सही घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३०४ सामने आहेत आणि त्यात त्याने ३६.५५ च्या सरासरीनं ८७०१ धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १११ विकेट्सही आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्यानं ५८ सामन्यांत ११७७ धावा व २८ विकेट्स घेतल्या आहेत.हेही वाचा -

मुंबईतील १८० ठिकाणी तुंबू शकतं पावसाचं पाणी

सिक्सर किंग युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम?
संबंधित विषय
ताज्या बातम्या