Advertisement

पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स ठरला ‘किंग’


पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स ठरला ‘किंग’
SHARES

सहा सामन्यांत पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या बाद फेरीत मजल मारण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. तरीही शुक्रवारी इंदूरमध्ये रंगलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ ‘किंग’ ठरला. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीमुळे मुंबई इंडियन्सने १७५ धावांचे आव्हान १९ षटकांतच पार करत सहा विकेट्सनी विजय मिळवला. नवव्या सामन्यातील तिसऱ्या विजयासह मुंबई इंडियन्सने बाद फेरीतील आशा जिवंत ठेवल्या आहेत.


सूर्यकुमारचे खणखणीत अर्धशतक

किंग्स इलेव्हन पंजाबने विजयासाठी ठेवलेले १७५ धावांचे उद्दिष्ट पार करताना मुंबईकर सूर्यकुमार यादवने इर्विन लुइसच्या साथीने मुंबईच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र लुइस (१०) लवकर बाद झाल्यानंतर त्याने युवा फलंदाज इशान किशनच्या साथीने मुंबईला सुस्थितीत आणून ठेवले. मैदानात चौफेर फटकेबाजी करत सूर्यकुमारने ४२ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांनिशी ५७ धावांची खेळी साकारली.


कृणाल पंड्याची तुफानी फटकेबाजी

१५.३ षटकांत मुंबई इंडियन्सची अवस्था ४ बाद १२० अशी असताना कृणाल पंड्या मैदानात उतरला. २७ चेंडूंत ५५ धावांची आवश्यकता असताना कृणाल पंड्याची तुफानी फटकेबाजी चाहत्यांना अनुभवता आली. त्याने अवघ्या १२ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ३१ धावा फटकावून मुंबईला सहा चेंडू राखून विजय मिळवून दिला. त्याला रोहित शर्माने नाबाद २४ धावा फटकावत चांगली साथ दिली.


‘गेल’वादळ घोंघावले

आयपीएलच्या लिलावात अखेरच्या क्षणी बोली लावण्यात आलेल्या ख्रिस गेलचा धमाका आजही पाहायला मिळाला. इंदूरच्या स्टेडियमवर गेल नावाचे वादळ घोंघावले खरे. पण बेन कटिंगने हे वादळ अवघ्या ५० धावांवर रोखत मुंबई इंडियन्सला सावरले. गेलच्या अर्धशतकी खेळीमुळे पंजाबला २० षटकांत ६ बाद १७४ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पंजाबसाठी मार्कस स्टॉइनिस (नाबाद २९), लोकेश राहुल (२४) यांनीही उपयुक्त योगदान दिले.


हेही वाचा -

मुंबई इंडियन्सचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’, पाचव्यांदा पराभवाची नामुष्की

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा