Advertisement

शिवाजी पार्कची 'सुपरस्टार' कामगिरी, मुलुंड मास्टरब्लास्टरवर 41 धावांनी विजय


शिवाजी पार्कची 'सुपरस्टार' कामगिरी, मुलुंड मास्टरब्लास्टरवर 41 धावांनी विजय
SHARES

मरीन ड्राइव्ह येथील मुंबई पोलीस जिमखान्यावर सुरू असलेल्या साई मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत शिवाजी पार्क सुपरस्टार्सने मुलुंड मास्टरब्लास्टर संघाचा 41 धावांनी धुव्वा उडवत सुपरस्टार कामगिरी केली. केदार कांगोची तुफानी फटकेबाजी आणि त्याला मिळालेली कल्पेश मेहताची सुरेख साथ यामुळे शिवाजी पार्क सुपरस्टार संघाने 18 षटकांत 194 धावा फटकावल्या. हे आव्हान पार करताना मुलुंड मास्टरब्लास्टर संघाची दमछाक झाली आणि त्यांचा डाव 153 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे शिवाजी पार्क सुपरस्टार्स संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार विजयाची नोंद केली.


केदार, कल्पेशची धुव्वाधार फलंदाजी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शिवाजी पार्क सुपरस्टार्सची सुरुवात काहीशी अडखळत झाली. पहिले तीन फलंदाज 5.1 षटकांत 49 धावांवर माघारी परतल्यानंतर केदार कांगो आणि कल्पेश मेहता यांनी मुलुंड मास्टरब्लास्टरच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. केदारने 36 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांनिशी 55 धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याला चांगली साथ देताना कल्पेशने 30 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 43 धावा फटकावल्या. त्यामुळे शिवाजी पार्क संघाला 18 षटकांत 6 बाद 194 धावा करता आल्या.


मुलुंडच्या फलंदाजांची शरणागती

शिवाजी पार्कचे विजयासाठीचे 195 धावांचे उद्दिष्ट पार करताना मुलुंड मास्टरब्लास्टरचे दोन्ही सलामीवीर पहिल्याच षटकांत धावचीत होऊन माघारी परतले. दिनेश सावंत आणि योगेश पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवत मुलुंड संघाला 5 बाद 49 अशा अडचणीत आणले. प्रतिक जैन (34) आणि झमीर शेख (नाबाद 40) यांनी मुलुंडची पडझड रोखली. पण त्यांना मुलुंडला विजयापर्यंत पोहोचवता आले नाही. शिवाजी पार्ककडून स्वप्नम कजारिया आणि योगेश पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.


सर्वोत्तम फलंदाज – केदार कांगो (55 धावा, शिवाजी पार्क सुपरस्टार्स)

सर्वोत्तम गोलंदाज – स्वप्नम कजारिया (2-15, शिवाजी पार्क सुपरस्टार्स)

सामनावीर – केदार कांगो (शिवाजी पार्क सुपरस्टार्स)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा