Advertisement

तनिष्क गवतेच्या १०४५ धावा, मात्र प्रणव धनावडेचा विश्वविक्रम कायम!


तनिष्क गवतेच्या १०४५ धावा, मात्र प्रणव धनावडेचा विश्वविक्रम कायम!
SHARES

एका सामन्यात १००० पेक्षा जास्त धावा कुणी करेल, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण दोन वर्षांपूर्वी प्रणव धनावडेने एका डावात १००९ धावांची खेळी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. त्याचा हा विश्वविक्रम बापजन्मात कुणी मोडणार नाही, असंच वाटलं होतं. पण दोन वर्षांनंतर प्रणव धनावडेचा हा विक्रम मोडीत काढण्याचं काम नवी मुंबईच्या तनिष्क गवतेनं केलं आहे.


कामगिरीला मान्यतेचं ग्रहण

मंगळवारी नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील यशवंतराव चव्हाण (इंग्रजी माध्यम) शाळेच्या तनिष्क गवतेनं १०४५ धावांची खेळी करत प्रणवचा हा विक्रम मोडीत काढला आहे. नवी मुंबई शील्ड आंतरशालेय १४ वर्षांखालील स्पर्धेत त्यानं या विक्रमाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेला मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता नसल्यामुळे प्रणव धनावडेचा विक्रम कायम राहणार, हे जवळपास निश्चित आहे. मात्र तरीही तनिष्कनं केलेल्या कामगिरीचं कौतुक सर्वत्र होत आहे.


दोन दिवस खेळपट्टीवर तंबू!

यशवंतराव चव्हाण इंग्रजी शाळेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्धी यशवंतराव चव्हाण संघाविरुद्ध खेळताना तनिष्क गवतेने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाची चुणूक दाखवली. पहिल्या दिवशी ४०७ धावांवर राहिलेल्या तनिष्कने दुसऱ्या दिवशीही धावांचा रतीब लावला. दुसऱ्या दिवशी ६३८ धावांची खेळी करून त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. ५१५ चेंडूंचा सामना करत तनिष्कने १४९ चौकार आणि ६७ षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या या धुंवाधार खेळीमुळे यशवंतराव चव्हाण इंग्रजी शाळेने ३ बाद १३२४ धावांचा डोंगर उभारला. हे आव्हान पार करताना प्रतिस्पर्धी यशवंतराव चव्हाण शाळेचा डाव मात्र अवघ्या ६३ धावांत आटोपला.


या स्पर्धेच्या मान्यतेसाठी आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात गेलो होतो. पण नोंदणी प्रक्रियेला दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने 'तुम्ही स्पर्धा सुरू करा, आम्ही मान्यतेसंदर्भातील प्रक्रिया सुरू करू', असं एमसीएकडून सांगण्यात आलं. माजी कसोटीपटू गुलाम पारकर आणि माजी रणजीपटू झुल्फिकार पारकर यांच्यासह आम्ही या स्पर्धेच्या मान्यतेसाठी एमसीएकडे दाद मागणार आहोत.

मनीष, यशवंतराव चव्हाण इंग्रजी माध्यम शाळेचे प्रशिक्षक


दोन वर्षांतच मोडला प्रणवचा विक्रम

दोन वर्षांपूर्वी प्रणव धनावडेने १००९ धावांचा विक्रम उभारत ११६ वर्षांपूर्वीचा विक्रम आपल्या नावावर केला होता. यापूर्वी इंग्लंडच्या ए. ई. जे. कॉलिन्सने शालेय क्रिकेटमध्ये ६२८ धावांचा विक्रम रचला होता. आता तनिष्कने १०४५ धावा करत प्रणव धनावडेचा विश्वविक्रम मोडला असला तरी स्पर्धेला मान्यता नसल्यामुळे प्रणव धनावडेचाच विक्रम कायम राहणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा