Advertisement

भारताचा पराभव; न्यूझीलंडनं जिंकलं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद

न्यूझीलंडने भारताला ८ गड्यांनी पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले.

भारताचा पराभव; न्यूझीलंडनं जिंकलं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद
SHARES

न्यूझीलंडने भारताला (india) ८ गड्यांनी पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. या सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडनं भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पहिल्या डावात भारताला २१७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडनं भारताला १७० धावांवर गुंडाळले.

राखीव दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून ५३ षटकात १३९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लॅथम आणि कॉन्वे लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात २ बळी घेणाऱ्या न्यूझीलंडच्या काईल जेमीसनला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आले.

सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडकडून राखीव दिवसाच्या चहापानापर्यंत सावध सुरुवात केली. चहापानानंतर विराटनं अश्विनच्या हातात चेंडू सोपवला. त्याने सलामीवीर फलंदाज टॉम लॅथमला वैयक्तिक ९ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर अश्विनने डेव्हॉन कॉन्वेला पायचित पकडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेला कॉन्वे या डावात १९ धावा काढू शकला. यानंतर रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनी संघाला आधार दिला.

एकेरी दुहेरी, मध्येच चौकार असा मेळ घालत दोघांनी भारताच्या गोलंदाजीला निष्प्रभ केले. ३१व्या षटकात चेतेश्वर पुजाराने रॉस टेलरला जीवदान दिले. बुमराहने टाकलेल्या चेंडूवर पुजाराने टेलरचा सोपा झेल सोडला. टेलर तेव्हा २७ धावांवर खेळत होता. विल्यमसन आणि टेलरने ३६व्या षटकात आपली अर्धशतकी भागीदारी आणि ३७व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले.

यानंतर दोघांनी विजयासाठी अपेक्षित असलेल्या धावांचे अंतर कमी करत भारतावर दबाव वाढवला. दरम्यान विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केले. रॉस टेलरने विजयी चौकार खेचत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसनने ८ चौकारांसह नाबाद ५२ तर टेलरने ६ चौकारांसह ४७ धावांची मौल्यवान खेळी केली.



हेही वाचा -

Corona vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण

  1. वन रुपी क्लिनिकचे संस्थापक राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा