
आयपीएलचा १४ वा हंगाम ९ एप्रिलपासून सुरु होत आहे. या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याच्यावर सोपविण्यात आली आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे रिषभ पंतची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्विटरवरून ही घोषणा केली आहे.
दिल्लीच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणे, पृथ्वी शाॅ, स्टीव्हन स्मिथ, आर. अश्विन आणि पंत यांच्यांमध्ये स्पर्धा असल्याचे पाहायला मिळाले होते. पण दिल्लीच्या संघाने पंतच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
रिषभ सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड विरुद्धच्या तीनही सीरिजमध्ये त्याने भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी केली. रिषभने म्हटलं आहे की, एक दिवस दिल्लीचं नेतृत्त्व करावं, हे स्वप्न मी आजपर्यंत पाहत आलो आहे. आज ते स्वप्न सत्यात उतरलं आहे. मी त्यासाठी खूप आनंदी आहे. मी संघव्यवस्थापनाचा आभारी आहे की त्यांनी कर्णधारपद सांभाळण्यासाठी मला योग्य मानलं आणि मला ही संधी दिली.
रिषभ पंत याने आयपीएलमध्ये ६८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २ हजार ७९ धावा पटकावल्या आहेत. त्यात तब्बल १८३ चौकार आणि १०३ षटकारांचा समावेश आहे. शिवाय १२ अर्धशतके आणि एका तडाखेबाज शतकाचादेखील त्यात समावेश आहे. मागील पर्वात रिषभने १४ सामन्यांमध्ये ३४३ धावा केल्या होत्या. १४ व्या मोसमात पंतसाठी दिल्ली संघ व्यवस्थापनाने ८ कोटी रुपये मोजले आहेत.
हेही वाचा -
