Advertisement

मुंबई इंडियन्सला अखेर विजयी सूर गवसला, चेन्नईवर आठ विकेट्सनी विजय


मुंबई इंडियन्सला अखेर विजयी सूर गवसला, चेन्नईवर आठ विकेट्सनी विजय
SHARES

गेल्या सहा सामन्यांत पाच वेळा पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर मुंबई इंडियन्सने शनिवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात गतविजेत्याच्या लौकिकाला साजेसा खेळ केला. चेन्नईविरुद्ध गेल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्सने यावेळी मात्र प्रतिस्पर्ध्यांना वरचढ होण्याची कोणतीही संधी न देता मागील पराभवाचा वचपा काढला. सुरैश रैनाच्या सुरेख खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सने ५ बाद १६९ धावा उभारल्या होत्या. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आठ विकेट्स आणि दोन चेंडू राखून विजय साकारला. मुंबई इंडियन्सला अखेर सूर गवसला असून त्यांचा हा सातव्या सामन्यातील दुसरा विजय ठरला आहे.


सूर्यकुमार-लुइसची दमदार सुरुवात

चेन्नईचे १७० धावांचे आव्हान पार करताना मुंबईकर सूर्यकुमार यादव आणि इर्विन लुइस (४७) यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली. सुरुवातीला धावांची गती राखण्यात ते काहीसे कमी पडले तरी ९.४ षटकांत त्यांनी ६९ धावा फलकावर लावल्या होत्या. सूर्यकुमारने ३४ चेंडूंत ४४ धावा फटकावल्या.


रोहित सुपरहिट

मुंबई इंडियन्सच्या आतापर्यंतच्या अपयशाचे कारण ठरले होते ते म्हणजे रोहित शर्माचा खराब फॉर्म. पण चेन्नईविरुद्धच्या सामन्यात रोहितने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत कॅप्टन इनिंग पेश केली. संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत रोहितने तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने दोन चेंडू राखून विजय साकारला. रोहितने ३३ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकार लगावून नाबाद ५६ धावा करत मुंबईच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.


रैना बरसे

तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्सच्या आतापर्यंतच्या यशात ड्वेन ब्राव्हो, कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी या सामन्यात मात्र सुरेश रैनाची दमदार फलंदाजी चाहत्यांना अनुभवता आली. पुण्यातील गहुंजे या चेन्नईच्या होम ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात सुरुवातीलाच शेन वॉटसनच्या रूपाने (१२) चेन्नईला पहिला धक्का बसल्यानंतर रैनाने अंबाती रायडूच्या साथीने चेन्नईचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भर घालून चेन्नईला सुस्थितीत आणले.


मुंबईच्या गोलंदाजांचे कमबॅक

११.१ षटकांत १ बाद ९७ अशी स्थिती असताना चेन्नई संघ २०० धावांपर्यंत मजल मारेल, असे वाटले होते. पण जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि मिचेल मॅकक्लेनाघन यांनी डेथ ओव्हर्समध्ये सुरेख गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर मारा केल्यामुळे चेन्नईला २० षटकांत ५ बाद १६९ धावांपर्यंतच झेप घेता आली. हार्दिक आणि मॅकक्लेनाघन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवत चेन्नईच्या फलंदाजांना वेसण घातली. सुरेश रैनाने चेन्नईकडून ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी केली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा