भारत-पाकिस्तान सामन्याला फिक्सिंगपेक्षाही याचा धोका!

 Mumbai
भारत-पाकिस्तान सामन्याला फिक्सिंगपेक्षाही याचा धोका!

भारत-पाक सामन्यावरुन फिक्सिंगची सुरू असलेली चर्चा ही केवळ बोगस असून, मुंगूस आणि सापामध्ये फक्त लढाईच होऊ शकते, असे वक्तव्य भारताचे ज्येष्ठ निवृत्त अंपायर माधव गोठोस्कर यांनी 'मुंबई लाइव्ह'जवळ केले. अर्थात, फिक्सिंग नसले तरी इंग्लंडमध्ये बेटिंगला मान्यता आहे, असे म्हणतात. त्यामुळे या सामन्यावर बेटिंग होणे तुम्ही टाळू शकत नाही. त्यामुळे फिक्सिंगपेक्षा बेटिंग रोखण्यावर भर द्यायला हवा, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

मॅच फिक्सिंगचे आरोप म्हणजे केवळ पब्लिसिटी स्टंट आहे. आमीर सोहेलसारखा टुक्कार कुणीतरी फिक्सिंगसारख्या आरोपाचे पिल्लू सोडतो आणि तुम्ही त्याला मोठे करता, हे बरोबर नाही. मॅचपूर्वी सनसनाटी निर्माण करण्याऐवजी सनसनाटी सामना व्हायला हवा आणि क्रिकेट जिंकायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मीडियाने या बातम्यांना महत्त्वच देऊ नये, असा सल्लाही गोठोस्करांनी दिला.


हेही वाचा - 

भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी - ब्रेट ली


दरम्यान, चॅपियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत गोठोस्करांनी नाराजी व्यक्त केली. पावसाच्या दिवसांत एवढी मोठी स्पर्धा भरवणेच चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेक्षक संपूर्ण सामना पाहण्यासाठी येतात आणि डकवर्थ-लुईसच्या नियमांचा आधार घेऊन सामन्याचा निकाल लावणे म्हणजे प्रेक्षकांवर अन्याय असल्याचे सडेतोड मतही त्यांनी मांडले. या स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया-बांग्लादेश आणि न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया लढत पावसाने वाया घालवली. इतक्या महत्त्वाच्या स्पर्धेत दोन्ही सामन्यांमध्ये चारही संघांना 1-1 गुण मिळतात आणि त्यातून बांग्लादेशसारखा संघ पुढे सेमीफायनलपर्यंत येऊन भारताकडून अत्यंत नामुष्कीचा पराभव स्वीकारतो, हे काही योग्य नाही. यामुळेच, फिक्सिंगसारख्या आरोपांनाही हवा मिळते. 1-1 गुण देण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी पुन्हा सामना खेळवला असता तर प्रेक्षकांनाही अधिक आवडले असते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या स्पर्धेतील, तसेच अंपायरिंग(पंचगिरी)च्या घसरत्या दर्जाबद्दल छेडले असता ते म्हणाले, आयपीएल आल्यापासून पंचगिरीवर टीका होतच आहे. सध्याच्या स्थितीत पंचांची कामगिरी ढासळली असली, तरी याच कुमार धर्मसेनाला सर्व संघांकडून सर्वोत्कृष्ट पंच म्हणून गुण मिळाले होते, हेही लक्षात घ्यायला हवे. पंचाला निर्णय बदलावा लागणे यावरुन त्याची कामगिरी ठरवणे आवश्यक ठरते आणि सामन्याचे नीट आयोजन होणे गरजेचे असते तसेच पंचांचेही नियोजन होणे गरजेचे असते. आता, भारत आणि बांग्लादेश सामन्यामध्ये पाकिस्तानच्या अलिम दारना पंच म्हणून नेमले असते तर योग्य ठरले असते. कारण, अंतिम सामन्यात अलीम दार पंच राहू शकत नाहीत. असो, पण पंचाला प्रत्येक वेळी निर्णय बदलायला लागणे हे काही योग्य नाही. शेवटी माणूस म्हणून काही चुका होणारच. पण मैदानावरच्या पंचालाच निर्णय कायम ठेवण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार द्यायला हवा. तिसऱ्या पंचाकडे हा अधिकार नको. जसे सुप्रीम कोर्टातही फेरविचार करण्याची याचिका असतेच ना, अगदी तसेच तिसऱ्या पंचाच्या निर्णयानंतरही निर्णय बदलण्याचा किंवा कायम ठेवण्याचा अधिकार मैदानावरील पंचांकडेच हवा!

Loading Comments