गणेशोत्सवाच्या गर्दीत चार दिवसात १३५ मोबाइल चोरीला


गणेशोत्सवाच्या गर्दीत चार दिवसात १३५ मोबाइल चोरीला
SHARES

मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम मोठ्या उत्साहात सुरू आहे. ठिकठिकाणी गणपती बाप्पा आपल्या मंडपात विराजमान होऊन चार दिवस उलटले, मात्र गणपतीच्या आगमन सोहळ्यात भुरट्या चोरट्यांनी विघ्न घातलं आहे.

गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हात धुऊन घेतले आहेत. त्यामुळे मोबाइल चोरीची तक्रार देणाऱ्यांची आता काळाचौकी पोलिस ठाण्याबाहेर रिघ लागली आहे. गेल्या चार दिवसात पोलिसांनी तब्बल १३५ मोबाइल चोरीच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे बंदोबस्तासोबतच गहाळ झालेल्या मोबाइलच्या तक्रारी नोंदवताना पोलिसांची दमछाक होताना पहायला मिळत आहे.


तरीही चोरी थांबेना

मुंबईच्या गणेशोस्तवात लालबाग, परळ भागातील गणपती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करत असतात. या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावूनसुद्धा भुरटे चोर गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या मौल्यवान वस्तू चोरतात. गर्दीच्या वेळी मोबाइल चोरण्यात या चोरांचा वेगळाच हातकंडा असतो. हा संपूर्ण परिसर काळाचौकी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही काळाचौकी पोलिस ठाण्यावर असते. साध्या वेशात पोलिस तैनात करूनसुद्धा चोरीच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाही.


तक्रारींची संख्या १३५ वर

अवघ्या चार दिवसांत काळाचौकी पोलिस ठाण्यात हरवलेले आणि चोरीला गेलेल्या मोबाइलच्या तक्रारींची संख्या आता १३५ वर पोहचली आहे. मागील काही वर्षांचा आढावा घेता एक ठरावीक टोळी गणेशोत्सवात चोरीसाठी या भागात दाखल होत असते. सुरत गॅंग आणि यूपी गॅंग अशी या दोन्ही टोळीची ओळख आहे.
मागील दोन वर्षांत या टोळीचे मनसुबे हाणून पाडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या गणेशोत्सवात देखील या चोरांभोवती फास आवळण्यासाठी काळाचौकी पोलिसांनी कंबर कसली असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा