१९९३च्या मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ताहिर मर्चंटचा मृत्यू


१९९३च्या मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ताहिर मर्चंटचा मृत्यू
SHARES

मुंबईतील १९९३ च्या साखळी बाॅम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद ताहीर मर्चंट ऊर्फ टकल्या याचा बुधवारी पुण्यातील ससून रूग्णालयात मृत्यू झाला. मुंबई बाॅम्बस्फोटाचा कट रचल्याच्या अारोपाखाली त्याला मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयानं गेल्या वर्षी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याला पुण्याच्या येरवडा तुरूंगात हलवण्यात आलं होतं. मात्र दोन दिवसांपूर्वी तब्येत खालावल्यानं ताहीर मर्चंटला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येतेय.


मंगळवारी जेवण झाल्यानंतर ताहीर त्याच्या कोठडी क्रमांक ४५ मध्ये होता. दरम्यान रात्री २ च्या सुमारास त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे तो अस्वस्थ होता. याबाबत त्याने जेलच्या पोलिसांना सांगितल्यानंतर रात्री ३ च्या सुमारास त्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आलं. पण उपचार सुरू असताना ३.४५ वा. च्या दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी तपासणी दरम्यान त्याला मृत्य घोषित केलं.

बी. के. उपाध्याय, अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि कारागृह महासंचालक


याकूब मेमनचा खास माणूस

डाॅन याकूब मेमनच्या सर्वात जवळचा आणि खास माणूस अशी ताहीर मर्चंटची ओळख होती. मुंबईत बाॅम्बस्फोट घडवून आणण्यासाठी भारतातून काही जणांना पाकिस्तातान ट्रेनिंगसाठी ताहीर मर्चंटने पाठवलं होतं, असा त्याच्यावर आरोप आहे. आरोपींचे पासपोर्ट तयार करण्यासह दुबईतून त्यानं बाॅम्बस्फोटाचा कट रचल्याचा आणि शस्त्र खरेदीसाठी पैसा जमा करण्याचाही आरोप त्याच्यावर आहे.


बाॅम्बस्फोटासाठी दुबईत घेतल्या बैठका

बाॅम्बस्फोट घडवून आणण्यासाठी ज्या काही बैठका दुबईत झाल्या, त्या बैठका ताहीर मर्चंटने घेतल्या होत्या. या बैठकांना अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनही उपस्थित होता, अशी माहिती आहे. ताहीर मर्चंटवरील सर्व आरोप सिद्ध झाल्यानं त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, बाॅम्बस्फोटानंतर तो भारतातून पळून गेला होता. त्याला २०१० मध्ये अबूधाबीमधून अटक करण्यात आली होती.


हेही वाचा -

अबू सालेमला जन्मठेप, तर दोघांना फाशी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा