अबू सालेमला जन्मठेप, तर दोघांना फाशी


अबू सालेमला जन्मठेप, तर दोघांना फाशी
SHARES

मुंबईतील १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू सालेम याला गुरूवारी टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून ताहीर मर्चंट आणि फिरोज खान या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

या खटल्याचा तब्बल २४ वर्षांनंतर म्हणजेच १६ जून २०१७ रोजी निकाल लागला होता. निकाल देताना न्यायालयाने बॉम्बस्फोटाचा कट रचणे, त्याचबरोबर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली सहा जणांना दोषी ठरवले होते. या सहाजणांपैकी मुस्तफा डोसा याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने गुरूवारी टाडा न्यायालयाने उर्वरीत पाच जणांना शिक्षा सुनावली. यापैकी ताहीर मर्चंट आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा, सालेम आणि करीमुल्ला खान या दोघांना जन्मठेपेसह दोन लाखांचा दंड तसेच रियाज सिद्दीकिला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.


फाशी का नाही?

अबू सालेमवर जे आरोप सिद्ध झाले त्या आरोपांमध्ये त्याला फाशीची शिक्षा होणे अपेक्षित होते. मात्र पोर्तुगालसोबत झालेल्या प्रत्यार्पण करारामुळे सीबीआयचे वकील जी. एस. सानप यांनी सालेमला जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली होती. सीबीआयची मागणी ग्राह्य धरत विशेष टाडा न्यायालयाने सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मरेपर्यंत जन्मठेपही नाही...

सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली असली, तरी पोर्तुगाल सरकारशी झालेल्या करारानुसार सालेमला जास्तीत जास्त २५ वर्षांचीच शिक्षा देता येणार आहे. सालेमचे २००५ साली पोर्तुगालावरून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. सालेम २००५ पासून तुरूंगात आहे. त्यामुळे २००५ पासून आतापर्यंत त्याने भोगलेली शिक्षा २५ वर्षांच्या शिक्षेतून वजा होऊ शकते. एवढेच नव्हे, तर पोर्तुगालच्या तुरूंगात प्रत्यार्पण करण्याअंतर्गत देखील तो २८ दिवस तुरूंगात होता. ही शिक्षाही त्याच्या शिक्षेतून वजा होण्याची शक्यता आहे.



काय केले होते सालेमने?

  • मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचतानाच सालेमने गुजरातवरून मुंबईला हत्यारे पाठवली होती. त्यातील एके ४७, २५० काडतूस आणि काही हातबॉम्ब १६ जानेवारी १९९३ ला अभिनेता संजय दत्तच्या घरी लपवले होते. दोन दिवसांनी म्हणजेच १८ जानेवारी १९९३ ला सालेम आणि आणखी एकाने संजय दत्तच्या घरी जाऊन दोन रायफल तसेच काही काडतूस परत घेतल्या होत्या.
  • फिरोज अब्दुल राशीद खानला हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले. दुबईत झालेल्या बैठकीत सामील असल्याचा आरोप देखील त्याच्यावर सिद्ध झाला होता.



  • या बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टर माईंड ताहीर मर्चंटला विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्याच्याबरोबच करीमुल्ला खानाला देखील दोषी ठरवण्यात आले.



  • रियाज सिद्दीकीला हत्यार पोचवल्याप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवले. मात्र त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊ न शकल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली.
  • १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाच्या या संपूर्ण प्रकरणात देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या आरोपातून मात्र सगळ्यांना मुक्त करण्यात आले.



  • १२ मार्च १९९३ साली झालेल्या मुंबई साखळी स्फोटात २५७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. तर ७१३ मुंबईकर जखमी झाले होते. या स्फोटामुळे २७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान देखील झाले होते.
  • १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी पहिल्या सुनावणीत टाडा न्यायालयाने १०० आरोपींना दोषी ठरवले होते. त्यापैकी याकूब मेमनला फासावर चढवण्यात आले होते.

हेही वाचा - 

१९९३ बॉम्बस्फोट : आरोपींना शिक्षा ७ सप्टेंबरला

बॉम्बस्फोटातील दोषींना कठोर शिक्षा करा!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा