बांधायच्या होत्या मुंडावळ्या हातात पडल्या बेड्या!

एका तरूणाने आपल्याच नात्यातील पीडित तरूणीचं इतकं मानसिक शोषण केलं, तिची इतकी बदनामी केली की अखेर बेड्या ठोकूनच या सैराटलेल्या तरूणाला आवर घालावा लागला.

बांधायच्या होत्या मुंडावळ्या हातात पडल्या बेड्या!
SHARES

'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग' या मराठीतल्या म्हणीनुसार लग्नासाठी आसुसलेल्या एका तरूणाने आपल्याच नात्यातील पीडित तरूणीचं इतकं मानसिक शोषण केलं, तिची इतकी बदनामी केली की अखेर बेड्या ठोकूनच या सैराटलेल्या तरूणाला आवर घालावा लागला. दीपक पुजारी (२४) असं या तरूणाचं नाव असून त्याला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


काय आहे प्रकरण?

घाटकोपरच्या असल्फा परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला काॅलेजची सुट्टी लागल्याने काही दिवसांपूर्वी ही तरुणी रत्नागिरी, ता. राजापूर मधील डोंगरगाव इथं आजोळी गेली होती. या ठिकाणी तिची ओळख चुलत मामाचा मुलगा दीपक पुजारी याच्याशी झाली. पहिल्याच भेटीत दीपकने तरुणीला प्रपोज केलं. मात्र तरुणीने त्याला नकार दिला.


फोन नंबर मिळवला

त्यानंतर हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात नव्हते. कालांतराने दीपक कामाच्या शोधात मुंबईला आला. त्यावेळी नातेवाईकांकडून पीडित तरुणीच्या घरातल्या सर्व सदस्यांचा फोन नंबर त्याने मिळवला.


'असा' आला प्रकार पुढं

काही दिवसांनी तरूणीच्या मावस भावाने तरूणीला फोन करून 'तुझे दीपकसोबत प्रेम संबध आहेत का ? ' ... असे विचारले. त्यावेळी तरुणीने त्यांना नकार देत आपण अनेक महिन्यांपासून दीपकच्या संपर्कातही नसल्याचं सांगितलं. त्यानंतर मामांच्या मुलांनी दीपकने तुझा फोटो व्हाॅट्स अॅपवर डिपी म्हणून का ठेवलाय? असं विचारताच तिच्या पायाखालची जमीन सरकली.


पोलिसांची भीती दाखवूनही...

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तरूणीने दीपकला फोन करून तो फोटो काढण्याची विनंती केली. मात्र दीपकने पुन्हा तिला फोनवर प्रपोज करत लग्नाची मागणी घातली. तेव्हाही तरुणीने त्याला नकार देत समजवण्याचा प्रयत्न केला. पण, दीपक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने तरुणीने त्याला पोलिसांची भीतीही दाखवली. त्यानंतर दीपक पुन्हा असं करणार नाही असा तरुणीचा समज झाला.


डिपीवर मुंडावळ्या घातलेला फोटो

मात्र दोन दिवसांनी पुन्हा तरुणीच्या मामाचा फोन आला. त्यावेळी दीपकने तरूणीच्या व्हाॅट्स अपवरील फोटोत छेडछाड करून दोघांचा मंडवळ्या घातलेला फोटो स्वत:च्या व्हाॅट्स अॅप डिपीवर ठेवला होता. एवढंच नव्हे, तर लग्नातील जोडप्याच्या फोटोप्रमाणे एडिटींग केलेली एक क्लिपही फेसबुकवर अपलोड केली होती. हे ऐकून तरूणीच्याही रागाचा पारा चढला.


'तुझ्याशीच लग्न करेन'

त्याला जाब विचारण्यासाठी पुन्हा फोन केल्या दीपकचा तोरा काही कमी झालेला नव्हता. तू कुठेही तक्रार केलीस तरी मला तुझ्याशीच लग्न करायचं असल्याचं उर्मट उत्तर त्याने दिलं. अखेर राग अनावर झालेल्या तरूणीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात दीपकविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानुसार घाटकोपर पोलिसांनी दीपकला अटक केली असून न्यायालयाने दीपकला २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा-

मोटरमनशी थट्टा पडली महागात, ३ तरूण गजाआड

सायन कोळीवाड्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा