वाडीबंदरमध्ये ५ लाखांच्या बनावट नोटा जप्त


वाडीबंदरमध्ये ५ लाखांच्या बनावट नोटा जप्त
SHARES

नोटाबंदीला एक वर्ष उलटत नाही तोच बनावट नोटांचा पुन्हा एकदा सुळसुळाट सुरु झाला आहे. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बनावट नोटा वितरीत करणाऱ्या पश्चिम बंगालच्या एका टोळीला वाडीबंदरमध्ये अटक केली आहे. ही टोळी पश्चिम बंगालमधून मुंबईत बनावट नोटांची खेप पाठवत असे. या टोळीचे हस्तक बांधकाम व्यवसायाच्या किंवा मासेमारीच्या व्यवसायानिमित्ताने मुंबईत वास्तव्य करून मुंबईत बनावट नोटा वितरीत करत असल्याचं समोर आलं आहे.


५ लाखांच्या बनावट नोटा

या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने सुलेमान रझ्झाक शेख उर्फ सोनू (४६) आणि सना उल झुलू निसार अली शेख उर्फ डब्बू (२२) नावाच्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ५ लाख रुपये बनावटीच्या २ हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. हे दोघेही पश्चिम बंगालचे राहणारे आहेत. या दोघांना खंडणी विरोधी पथकाने भादंवि ४८९(अ) , ४८९(ब) १२०(ब) आणि ३४ अंतर्गत अटक केली आहे. या दोघांना कोर्टात हजर करण्यात आल्यावर कोर्टाने त्यांचा ताबा १५ तारखेपर्यंत खंडणी विरोधी पथकाकडे सोपवला आहे.


'अशी' केली अटक

रविवारी प्रिन्सेस गार्डन बस स्टॉप जवळ काही इसम बनावट नोटा घेऊन येणार असल्याची खबर खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तिथे सापळा रचला. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास सुलेमान आणि सना या परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळले. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता २ हजारच्या २४० नोटा खंडणी विरोधी पथकाच्या हाती लागल्या. या नोटांची किंमत ४ लाख ८० हजार रुपये इतकी आहे.


हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या

रविवारी वाडीबंदर परिसरातून जप्त करण्यात आलेल्या २ हजारच्या बनावट नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्याच असल्याचं खंडणी विरोधी पथकातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. जप्त करण्यात आलेल्या नोटांचा सिरीयल नंबर एकसारखाच असल्याने या नोटा जप्त करण्यात आल्या.



हेही वाचा-

चायनीज नीट न झाल्याचा जाब विचारला, 'त्याने' उकळतं तेल अंगावर फेकलं!

सांताक्रूझमध्ये १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा