26/11 Attack : कसाबविरोधात साक्ष देणाऱ्या 'तिला' न्याय कधी मिळणार?

२६/११ हल्ल्यात शदीह झालेल्या मुंबई पोलिसांच्या कर्तबगार शहिदांना आणि जीव गमावलेल्या नीष्पापांना न्याय मिळवून देणाऱ्या या तरूणीला न्याय कधी मिळणार?

26/11 Attack : कसाबविरोधात साक्ष देणाऱ्या 'तिला' न्याय कधी मिळणार?
SHARES

२६/११... मुंबईकरांच्या आयुष्यातील काळा दिवस. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई हादरली ती गोळ्यांच्या आवाजानं. याच दिवशी समुद्र मार्गानं मुंबईत घुसून १० दहशतवाद्यांनी निष्पापांचा जीव घेतला. यात मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी शहीद झाले. कोणीही न विसरू शकणाऱ्या या घटनेला १२ वर्ष पूर्ण झाली आहेत.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात निष्पापांचा बळी घेणाऱ्या कृरकर्मा अजमल कसाबला तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन पकडलं. कसाब हा एकमेव दहशतवादी होता ज्याला पोलिसांनी जिवंत पकडलं होतं. पण याच कृरकर्मा कसाबला फासावर पोहोचवण्याच्या कामात मोलाची भूमिका बजावली होती ती देविका रोटावन या मुलीनं.

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आमचं आयुष्य बदललं आहे. त्या हल्ल्यात माझ्या पायाला गोळी लागली होती. सुदैवानं मी वाचली. तो दिवस आमच्यासाठी आणि देशासाठी नक्कीच काळा दिवस होता. पण समाधान इतकंच आहे की माझ्या साक्षिमुळे त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली.

देविका रोटावन, साक्षिदार

२६/११ हल्ल्यात शदीह झालेल्या मुंबई पोलिसांच्या कर्तबगार शहिदांना आणि जीव गमावलेल्या नीष्पापांना न्याय मिळवून देणाऱ्या या तरूणीला स्वत: न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. देविका रोटावननं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

केंद्र तसेच राज्य सरकारनं राहण्यासाठी घर देण्याचं आश्वासन देऊनही अद्याप त्याची पूर्तता न केल्यानं देविका रोटावननं ही याचिका दाखल केली आहे. आपल्या कुटुंबियांना राहण्यासाठी घर व आपलं पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनानं तरतूद करावी, अशी मागणी तिनं याचिकेतून केली आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे वांद्रे सुभाषनगर इथल्या चाळीतील भाड्याच्या खोलीत भेट देऊन तिची विचारपूसही केली होती. देशावर झालेल्या या दहशतवादी हल्यातील एक प्रमुख साक्षीदार म्हणून ईडब्लूएस स्कीम अंतर्गत तिला घर देण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र त्याची अद्याप पूर्तता न केल्याने देविका हिने अॅड. उत्सव बैंस यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

माझ्या एका साक्षिनं सर्वांना न्याय मिळाला. पण आता मला न्याय हवा. २०११ साली आमच्याकडे सरकारचे काही अधिकारी आले होते. त्यांनी आम्हाला घर देण्याचं वचन दिलं होतं. पण १२ वर्ष पूर्ण झाली पण सरकारनं आमची दखल घेतली नाही. सरकारनं आम्हाला दिलेल्या वचनाची आठवण करून देण्यासाठी ही याचिका केली आहे.  

देविका रोटावन, साक्षिदार

२६/११ रोजी अचानक लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी अजमल आमिर कसाब आणि इतर दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यावेळी देविका आपल्या कुटुंबियांसह पुण्याला जाण्यासाठी स्टेशन परिसरात आली होती. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात देविकाच्या उजव्या मांडीला गोळी लागली होती.

अतिरेक्यांनी तिच्या दिशेने ग्रेनेड हल्लाही केला त्यावेळी तिचे पालकही त्याठिकाणी उपस्थित होते. गोळी लागल्यामुळे देविका बेशुद्ध झाली होती. दहशतवादी स्टेशन परिसरातून निघून जाताच पोलिसांनी तिला जवळच्याच सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिच्यावर सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.



हेही वाचा

26/11 Attack : सागरी ‘रडार’ यंत्रणा दुरुस्तीविना अडगळीत ! देशातील ३८ ठिकाणी रडार यंत्रणा तैनात

26/11 Attack : मुंबई हल्ल्यांनंतर समुपदेशकांचे महत्त्व कळाले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा