२६/११ स्पेशल : सुरक्षा आहे की मस्करी? अजूनही गांभीर्य नाहीच का?

मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. बुलेटप्रूफ जॅकेट्सपासून ते महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यापर्यंत. पण हल्ल्यानंतर ९ वर्षांनी या उपाययोजनांची काय परिस्थिती आहे? त्यातल्या किती प्रत्यक्षात आल्या? किती कागदावरच राहिल्या? आणि किती प्रत्यक्षात येऊनही पुन्हा गायब झाल्या? 'मुंबई लाइव्ह'नं या सगळ्याचा रिअॅलिटी चेक करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून समोर आलेलं वास्तव धक्कादायकच नाही तर गंभीर इशारा देणारं होतं.

२६/११ स्पेशल : सुरक्षा आहे की मस्करी? अजूनही गांभीर्य नाहीच का?
SHARES

फक्त मुंबईकरच नव्हे, फक्त भारतीयच नव्हे तर संपूर्ण जग २६/११/२००८ ला झालेला मुंबईवरचा हल्ला कधीही विसरू शकणार नाही. १६४ लोकांचा जीव घेणाऱ्या या क्रूर हल्ल्यामध्ये ३०० हून अधिक जखमी झाले होते. अजमल कसाब आणि त्याच्या ९ साथीदारांनी मिळून आख्खी मुंबई आणि संपूर्ण देश हादरवून टाकला होता.

या हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. बुलेटप्रूफ जॅकेट्सपासून ते महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यापर्यंत. पण हल्ल्यानंतर ९ वर्षांनी या उपाययोजनांची काय परिस्थिती आहे? त्यातल्या किती प्रत्यक्षात आल्या? किती कागदावरच राहिल्या? आणि किती प्रत्यक्षात येऊनही पुन्हा गायब झाल्या? 'मुंबई लाइव्ह'नं या सगळ्याचा रिअॅलिटी चेक करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून समोर आलेलं वास्तव धक्कादायकच नाही तर गंभीर इशारा देणारं होतं.


सीएसटीएमवरचे मेटल डिटेक्टर करतायत काय?

ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर बेछूट गोळीबार करत अजमल कसाबने ५२ नागरिकांची हत्या केली आणि ५२ जणांना जखमी केलं, तिथली सुरक्षा व्यवस्था पोटात भितीचा गोळा आणण्यासाठी पुरेशी होती. रोज इथे लाखो प्रवासी ये-जा करतात. रेल्वेच्या दाव्यानुसार या स्थानकावर तब्बल ३०० सीसीटीव्ही कॅमेरे निगराणीसाठी बसवण्यात आले आहेत. पण जर मेटल डिटेक्टरच व्यवस्थित बसवले नसतील, तर दहशतवादी स्थानकात शिरल्यानंतर या सीसीटीव्हींचा उपयोग काय?



सीएसटीएम वर एकूण २० मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. त्यापैकी मेन गेटवर, म्हणजेच जिथून सर्व प्रवासी स्थानकात येतात, तिथे बसवण्यात आलेल्या मेटल डिटेक्टरची अवस्था गंभीर आहे. मुळात हे मेटल डिटेक्टर का लावलेत असाच प्रश्न पडावा. कारण या डिटेक्टरच्या आजूबाजूने अगदी सहज प्रवासी ये-जा करू शकतात, करतात. शिवाय, या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची बॅग चेक करण्याची कोणतीही यंत्रणा इथे नाही. रेल्वे प्रशासनाला विचारणा केल्यानंतर, 'प्रवासी संशयित वाटला तरच त्याची बॅग आम्ही तपासतो' असे उत्तर मिळाले. कदाचित दहशतवाद्यांच्या चेहऱ्यावर 'दहशतवादी' लिहिले असते, असाच काहीसा समज किंवा गैरसमज रेल्वे अधिकाऱ्यांचा झाला असावा!


कफ परेडवर निगराणी करतंय कोण?

२६/११च्या हल्ल्यावेळी ज्या कफ परेडमधून दहशतवादी मुंबईत घुसले, तिथे शासनाने लागलीच 'सुरक्षा उपाययोजना' म्हणून एक वॉच टॉवर बनवला. वास्तविक, या वॉच टॉवरमधून पोलिसांनी त्या परिसरावर २४ तास निगराणी ठेवणं अपेक्षित आहे. पण २५/११ म्हणजेच २६/११च्या एक दिवस आधी जेव्हा 'मुंबई लाइव्ह'ची टीम तिथे पोहोचली, तेव्हा हा वॉच टॉवर रिकामाच दिसला! या ठिकाणी पोलिसांचा कुठेच पत्ता नव्हता. होता तो फक्त एक सीसीटीव्ही कॅमेरा! म्हणजे जर दहशतवादी आत शिरणारच असतील, तर त्यांना कुणीही अडवणार नाही. फक्त ते कोण होते, हे आपल्याला काहीतरी घडून गेल्यानंतर कळेल!



अजूनही बुलेटप्रूफ जॅकेट्स सापडेनात!

कोणत्याही हल्ल्यावेळी पोलिसांना स्वसंरक्षणासाठी बुलेटप्रूफ जॅकेट्स असणं अनिवार्य आहे. मात्र, सध्या पोलिसांकडे असलेले बुलेटप्रूफ जॅकेट २६/११च्या हल्ल्यावेळी कुचकामी ठरले आणि पोलिस दलाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. त्यानंतर दोनदा यासाठी निविदा काढूनही अद्याप पोलिसांच्या हाती हे जॅकेट्स पडलेले नाहीत!


जॅकेट्स खरेदीतही घोटाळा

२०१०मध्ये या बुलेटप्रूफ जॅकेट्ससाठी निविदा काढण्यात आल्या. राज्य सरकारने पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठीच्या ३९० कोटींपैकी ६.२ कोटी रूपये किंमतीच्या ८२ बुलेटप्रूफ जॅकेट्सची खरेदीही निश्चित करण्यात आली होती. पण या जॅकेट्सच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाल्यामुळे ही खरेदी रद्द करण्यात आली.

या प्रकारानंतर सजग झालेल्या शासनाने २०१५ साली म्हणजे तब्बल ५ वर्षांनी पुन्हा निविदा काढल्या. यावेळी लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि हेल्मेट पुरवणाऱ्या एमकेयू इंडस्ट्रीज याच कंपनीला कंत्राट देण्यात आले. त्यांच्याकडून ५ हजार बुलेटप्रूफ जॅकेट्स पोलिस दलाला देण्यातही आले आहेत. मात्र, आता ताकही फुंकून प्यायचं ठरवलेल्या पोलिस दलाने 'गुणवत्ता चाचणी केल्याशिवाय ही जॅकेट्स ताब्यात घ्यायचीच नाहीत' असा निर्णय घेतला. मात्र त्यामुळे अजूनही जॅकेट्ससाठी पोलिस कर्मचाऱ्यांना किती काळ वाट पहावी लागणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.


परिस्थिती बदलणार कधी?

गेल्या कित्येक वर्षांपासून कफ परेड परिसरातल्या सुरक्षेचा पाठपुरावा करणारे दामोदर तांडेल यांनी तर इथल्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, कफ परेडमधल्या वॉच टॉवरमध्ये कधीच पोलिस नसतात. शिवाय, या परिसरात तब्बल ४५० बोटी आहेत. पण त्या बोटींची कधीच चेकिंग केली जात नाही. २६/११च्या हल्ल्यानंतर या बोटींवरच्या कामगारांना बायोमॅट्रिक कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आजपर्यंत फक्त ५०% लोकांनाच असे कार्ड देण्यात आले आहेत. शिवाय आत खोल समुद्रात अनेक बांग्लादेशी आणि नेपाळी खलाशी बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.



हाय स्पीड बोटी पडूनच!

२६/११ हल्ल्यानंतर समुद्रावर सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी ५३ हायस्पीड बोटी मागवण्यात आल्या होत्या. मात्र यापैकी अनेक बोटी ठिकठिकाणी समुद्रकिनारी धूळ खात पडल्या असल्याची खंतही यावेळी दामोदर तांडेल यांनी व्यक्त केली. काही ठिकाणी बोटींमध्ये पेट्रोलच नाही तर कुठे बोटी चालवण्यासाठी चालक नाहीत! यावेळी पुराव्यादाखल त्यांनी रत्नागिरीच्या मिरकरवाडा परिसरात धूळखात पडून असलेल्या बोटींचे फोटोही दाखवले.

मुंबई हल्ल्यानंतर प्रत्येक वर्षी अशा प्रकारे सुरक्षेचा रिअॅलिटी चेक होतो. प्रत्येक वर्षी संबंधितांना विचारणा होते. प्रत्येक वर्षी त्यांच्याकडून आश्वासनं मिळतात. पण कोणत्याही वर्षी या परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्याचं मात्र दुर्दैवानं दिसत नाही. किमान पुढच्या वर्षी होणाऱ्या रिअॅलिटी चेकमध्ये तरी मुंबईच्या सुरक्षेची ही गंभीर 'रिअॅलिटी' बदलावी अशी अपेक्षा ठेवणंच आपल्या हातात आहे. माध्यम म्हणून आमच्या आणि सो कॉल्ड 'मुंबई स्पिरिट' जिवंत ठेवणारे मुंबईकर म्हणून तुमच्या!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा